
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव लागणार असल्याचे प्रतिपादन वनमंत्री गणेश नाईक यांनी वाशी येथे केले. नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने दि. बा. पाटील यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्ताने वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सुधारक सोनवणे, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या वेळी गणेश नाईक पुढे म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बां. चे नाव लागणार हा मला विश्वास आहे. कारण नामकरण चळवळ ही सर्वांनीच जिद्दीने मनावर घेतली आहे, लवकरच याबाबतीत राज्य आणि केंद्र स्तरावर शासकीय सोपस्कार पार पडून येत्या काही महिन्यांतच जनभावनेचा आदर करून निर्णय होईल.
दशरथ भगत म्हणाले की, दि. बा. पाटील यांनी संघर्ष करून पीडिताना न्याय मिळवून दिला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत पीडित घटकांच्या न्यायासाठी चळवळ निर्माण करणे आवश्यक आहे. दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखालील संघर्षातून साडेबारा टक्के योजना लागू झाली. त्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे.
या प्रसंगी दि. बा. पाटील यांच्या संघर्षमय, प्रेरणादायी जीवनाचे चित्रप्रदर्शन, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, ज्येष्ठ नागरिक, कचरावेचक भगिनी, कर्तव्यदक्ष महिला रिक्षाचालक भगिनी व अन्य उल्लेखनीय सामाजिक योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान, पाणपोई लोकार्पण असे विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले.