

नवी मुंबई : अखेर गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा संपून पहिल्या विमानाने गुरुवारी ‘टेक ऑफ’ केल्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानोड्डाणास सुरुवात झाली. या विमानतळावरून विमान सेवा सुरू झाल्याने नवी मुंबईकरांनी आनंद व्यक्त केला आहे.
या विमानतळाला केंद्र आणि राज्य शासनाने लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव अद्याप न दिल्याने गावोगावी निषेधही नोंदवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन झाले आहे. तेव्हापासून विविध चाचण्या आणि इतर सोपस्कार होऊन २५ डिसेंबर रोजी सकाळी ८.४० वाजता नवी मुंबईतून पहिल्या विमानाने हैदराबादच्या दिशेने उड्डाण केले. तत्पूर्वी नवी मुंबई
विमानतळावर इंडिगो एअरलाइन्सचे बंगळुरू येथून आलेले पहिले विमान सकाळी ८ वाजता लॅण्ड झाले. बंगळुरूहून आलेल्या इंडिगो विमानाचे धावपट्टीवर आगमन झाल्यावर पाण्याचे फवारे उडवून वॉटर जेट (पाण्याच्या तोफांची) सलामी देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर इंडिगोचे हेच विमान सकाळी ८.४० वाजता हैदराबादच्या दिशेने झेपावले. या विमानोड्डाणचा ऐतिहासिक क्षण आपल्या कॅमेऱ्यात आणि मोबाईलमध्ये बंदिस्त करण्यासाठी हजारो नागरिकांची पनवेल आणि उलवे परिसरात गर्दी दिसली.
पहिल्या दिवशी नवी मुंबई ते गोवा (मोपा), कोची, बंगळुरू, हैदराबाद, दिल्ली, अहमदाबादसाठी इंडिगो, अकासा एअर, एअर इंडिया एवस्प्रेस, स्टार एअर या कंपन्यांनी विमानसेवा दिली. प्रारंभीच्या टप्प्यात नवी मुंबई विमानतळ सकाळी ८ ते रात्री ८ या १२ तासांच्या कालावधीत कार्यरत राहणार आहे. दररोज २३ नियोजित उड्डाणे सुरू राहतील. यानंतर फेब्रुवारी २०२६ पासून विमानतळ २४ तास सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणांनाही सुरुवात होणार आहे.
२७ गावांतील ग्रामस्थांना मोफत विमान प्रवास...
दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प ज्या भूमिपुत्रांच्या जमिनींवर उभे राहिले आहे, त्या २७ गावांतील भूमिपुत्रांना अदानी फाऊंडेशनच्या वतीने पहिल्या विमानातून मोफत विमान प्रवासाची सोय करण्यात आली होती.
गौतम अदानी यांच्याकडून प्रवाशांचे स्वागत
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि त्यांच्या पत्नी प्रीती अदाणी हेही गुरुवारी सकाळी लवकर विमानतळावर दाखल झाले. “नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीत सहभागी झालेल्यांसोबत उभे राहणे हा आमच्यासाठी सन्मानाचा क्षण होता. त्यांचे आशीर्वाद, धैर्य आणि जिद्द आम्हाला दररोज अधिक चांगली सेवा देण्यासाठी आणि देशसेवेसाठी अधिक मेहनत करण्याची प्रेरणा देतात,” असे अदानी यांनी सांगितले.