

नवी मुंबई : राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू असतानाही खारघर परिसरातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक भागांत नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी सिडकोच्या रायगड भवन कार्यालयावर धडक मोर्चा काढत जोरदार आंदोलन केले. भाजपचे नगरसेवक समीर कदम आणि नगरसेविका उषा अडसुळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी सिडको प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात घोषणाबाजी करत पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली.
जवळपास तीन तास चाललेल्या ठिय्या आंदोलनानंतर सिडको प्रशासनाने आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पुढील १० ते १५ दिवसांत पाणीपुरवठा नियमित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे लेखी आश्वासन सिडकोने दिले. त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
आंदोलनाचा वाढता दबाव लक्षात घेऊन सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नगरसेवक समीर कदम, नगरसेविका उषा अडसुळे आणि विविध गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींसोबत सुमारे दोन तास बैठक घेतली. या बैठकीत वितरण व्यवस्थेतील त्रुटी, उपलब्ध पाण्याचे नियोजन, वाढती लोकसंख्या आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली.
सिडकोला १० ते १५ दिवसांची मुदत
सिडको प्रशासनाने स्पष्ट केले की, जुलैपूर्वी धरणातील पाणीसाठा अवघ्या १० टक्क्यांवर आल्याने पाणी जपून वापरण्याची वेळ आली होती. मात्र, अलीकडील पावसामुळे धरणातील साठ्यात वाढ झाली असून लवकरच परिस्थिती सुधारेल. पाणीपुरवठा वाढवून नियमित करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर निर्णय घेण्यात येत असून त्यासाठी १० ते १५ दिवसांचा कालावधी आवश्यक असल्याचे प्रशासनाने लेखी पत्राद्वारे कळविले.
टँकर व्यवस्थेला प्रोत्साहन
आंदोलनादरम्यान नागरिकांनी सिडकोच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यातील धरणे भरून वाहत असताना खारघरमध्ये मात्र नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला. नियमित नळपाणी पुरवठा करण्याऐवजी टँकर व्यवस्थेला प्रोत्साहन दिले जात असून त्यामुळे टँकर माफियांना खतपाणी मिळत असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. टँकरवर अवलंबून राहिल्याने नागरिकांचे आर्थिक व मानसिक शोषण होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
पाणीकपात बंद करण्याची मागणी
नगरसेवक समीर कदम यांनी दर सोमवारी केली जाणारी कथित अनधिकृत पाणीकपात तातडीने बंद करण्याची मागणी केली. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या नियमित पाणीकपातीबाबत सिडकोचा कोणताही अधिकृत आदेश किंवा नियम नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ही पाणीकपात नेमकी कोणाच्या आदेशाने केली जाते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच पाणीपुरवठ्याची निश्चित वेळ जाहीर करून नागरिकांचा होणारा त्रास थांबवावा, अशी मागणीही त्यांनी केली.