

नवी मुंबई : नवी मुंबईतील जलद गतीने शहरीकरण होत असलेल्या खारघर परिसरात गेल्या दोन वर्षांत तिसऱ्या सोनेरी कोल्ह्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील संवेदनशील वन्यजीव अधिवासांच्या संरक्षणाबाबत तीव्र चिंता व्यक्त केली जात असून, पर्यावरणप्रेमींनी यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. खारघरमधील कांदळवन आणि पाणथळ परिसरात एका कोल्ह्याचा कुजलेला मृतदेह आढळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मृतदेह छिन्नविछिन्न आणि कुजलेल्या स्थितीत होता, ज्यामुळे प्राण्याचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. प्राथमिक तपासणीत हा प्राणी सोनेरी कोल्हा असल्याचे स्पष्ट झाले असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. अहवाल आल्यानंतर वनरक्षकांच्या उपस्थितीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुरक्षा ऐरणीवर
या सलग घटनेमुळे किनारपट्टी नियमन क्षेत्र म्हणजेच सीआरझेड-एक अंतर्गत येणाऱ्या परिसरातील वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पर्यावरण कार्यकर्त्या सीमा टांक यांनी बुधवारी हा मृतदेह निदर्शनास आणून दिल्यानंतर वन विभागाला तात्काळ याची माहिती दिली. या संदर्भात बोलताना त्या म्हणाल्या की, पाणथळ आणि झुडपी जंगलात वास्तव्य करणारे सोनेरी कोल्हे परिसरातील पर्यावरणीय समतोलासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.