Navi Mumbai Tragedy : घरगुती शिकवणीवर स्लॅब कोसळला; सातवीतील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर २ येथील विद्या भवन सोसायटीमध्ये सुरू असलेल्या घरगुती शिकवणी वर्गावर गुरुवारी सायंकाळी पहिल्या मजल्यावरील स्लॅब अचानक कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली.
Navi Mumbai Tragedy : घरगुती शिकवणीवर स्लॅब कोसळला; सातवीतील विद्यार्थ्याचा दुर्दैवी  मृत्यू
Published on

नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर २ येथील विद्या भवन सोसायटीमध्ये सुरू असलेल्या घरगुती शिकवणी वर्गावर गुरुवारी सायंकाळी पहिल्या मजल्यावरील स्लॅब अचानक कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत मलब्याखाली अडकलेल्या १२ विद्यार्थी आणि एका शिक्षिकेला अग्निशमन दलाने बाहेर काढले. मात्र उपचारादरम्यान मनीष म्हसे (१३) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

ही घटना गुरुवारी सायंकाळी सुमारे ५.२० वाजण्याच्या सुमारास कोपरखैरणे सेक्टर २ मधील प्लॉट क्रमांक १२ वरील विद्या भवन सोसायटीत घडली. तळमजल्यावर घरगुती शिकवणी वर्ग सुरू असताना पहिल्या मजल्यावरील स्लॅबचा काही भाग अचानक कोसळून खाली पडला. त्या वेळी वर्गात विद्यार्थी उपस्थित होते. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये आणि परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच वाशी, कोपरखैरणे आणि ऐरोली येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू करत मलब्याखाली अडकलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेतला.

काही वेळ चाललेल्या बचाव मोहिमेनंतर १२ विद्यार्थी आणि एक शिक्षिका अशा एकूण १३ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. त्यापैकी मनीष म्हसे या १३ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिली. इतर विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, संबंधित इमारत सुमारे १९९८ साली बांधण्यात आली असून सोसायटीमध्ये एकूण १६ कुटुंबे वास्तव्यास आहेत. दुर्घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीतील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. शहरात सध्या सुमारे ६५ इमारती धोकादायक असल्याची नोंद आहे. या दुर्घटनेनंतर जुन्या इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

बचाव करण्यात आलेल्यांची नावे

सिद्धांत गुप्ता (८), प्रिन्स सोनी (११), आयशा खान (११), कुलसुम खान (१५), निष्का धनवाडे (१४), मनीष म्हसे (१३), आराध्या बोडसे (१४), तन्वी श्रीवास्तव (७), देवांश पुजारी (१२), राजदीप वानखेडे (१०), पार्थ खैरनार (१४), रुद्र येलूरकर (५) आणि शिक्षिका शामली चौधरी (५३).

logo
marathi.freepressjournal.in