
नवी मुंबई : मुंबईतील आझाद मैदान येथे सुरु असलेले मराठा आंदोलनाची पाच दिवसांनी यशस्वी सांगता झाली. उपोषण मागे घेतल्यावर हजारो आंदोलकांनी मुंबई सोडली. नवी मुंबईतील सिडको प्रदर्शनी केंद्रात राहणाऱ्या सुमारे १५ ते २० हजार मराठा आंदोलकांनी गावाला जवळ केले. एवढ्या मोठ्या संख्येने वास्तव्य असल्याने कचरा मोठ्या प्रमाणात झाला होता. मराठा आंदोलक गेल्यावर मंगळवारी रात्रीपासून सफाईला मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सुरवात करत सकाळ पर्यंत "डीप क्लिनिग" केले. ज्यात तब्बल २० टन कचरा निघाला.
आरक्षण मागणीसाठी २९ तारखे पासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरु होते. मनोज जरांगे यांच्या नेतृ्वाखाली सुरु करण्यात येणाऱ्या आंदोलनाला पंधराशे गाड्या आणि पाच हजार आंदोलकांना परवानगी देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात लाख भर आंदोलक मुंबईत आले होते. पावसाने अनेकांनी मुंबई ऐवजी नवी मुंबईत मुक्कम करणे पसंत केले. त्यांची सोय वाशीतील सिडको प्रदर्शनी केंद्र, कांदा बटाटा मार्केट फळ मार्केट अशा ठिकाणी करण्यात आली होती.
यातील सिडको प्रदर्शनी केंद्रात वीस ते पंचांवीस हजार आंदोलकांचा रोज वावर होत होता. रोज दोन वेळा साफसफाई केली जात होती. मात्र आंदोलन लांबण्याच्या अंदाजाने सोमवारी किमंत पाच ते सहा लाख लोकांचे तयार जेवण गाव खेड्यातून आले. यात पोळ्या (चपाती) ज्वारी बाजरीच्या भाकरी धपाटे चटणी ठेसा लोणचे सुक्या भाजी यांचा समावेश होता. या शिवाय वस्तूही मोठ्या प्रमाणात आल्या.