नवी मुंबईत महिला ओबीसी आरक्षण; अनेक नावांची चर्चा, अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

नवी मुंबईत महिला ओबीसी आरक्षण; अनेक नावांची चर्चा, अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

नवी मुंबई मनपाच्या महापौरपदासाठी महिला OBC प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, महापौरपदाच्या शर्यतीत अनेक महिला नगरसेविकांची नावे चर्चेत आली आहेत.
Published on

नवी मुंबई : नवी मुंबई मनपाच्या महापौरपदासाठी महिला OBC प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, महापौरपदाच्या शर्यतीत अनेक महिला नगरसेविकांची नावे चर्चेत आली आहेत. विशेषतः नाईक कुटुंबाचा राजकीय इतिहास पाहता, घरातीलच एखाद्या व्यक्तीला किंवा नातेवाईकाला प्राधान्य दिले जाण्याची परंपरा राहिली असल्याने, यंदाही विविध नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.

मात्र, यावेळी परिस्थिती पूर्वीसारखी नसून, जरी भाजपने एकहाती स्पष्ट बहुमत मिळवले असले तरी, पक्षाची निर्णयप्रक्रिया ही परंपरेनुसार राज्य नेतृत्वाच्या हाती असल्याने महापौरपदी नेमकी कोणाची वर्णी लागणार, याबाबत नवी मुंबईकरांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका ही राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक मानली जाते. तब्बल दहा वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीत, वरिष्ठ पातळीवर अनेक प्रयत्न होऊनही भाजप-शिवसेना युती स्थानिक नेत्यांच्या मतभेदांमुळे होऊ शकली नाही. निवडणूकपूर्व काळात शिवसेना (शिंदे गट) बहुमत मिळवेल, असे चित्र असले तरी, भाजपने ६५ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत सिद्ध केले. या विजयाचे श्रेय राजकीय जाणकारांकडून वनमंत्री गणेश नाईक यांना दिले जात आहे.

गणेश नाईक यांनी निवडणुकीत एकहाती विजय मिळवून पक्षातील आपले वजन सिद्ध केले असले, तरी पक्ष नेतृत्व त्यांच्या निकटवर्तीय नातेवाईकांना हिरवा कंदील देणार की एखादा वेगळा चेहरा पुढे आणणार, याबाबत सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या पहिल्या नागरिकपदावर कोण विराजमान होणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

यांची नावे चर्चेत

महापौरपदासाठी ज्येष्ठ नगरसेविका नेत्रा नाईक, माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या भगिनी भरती पाटील, माजी महापौर सागर नाईक यांच्या सासू रेखा म्हात्रे, ज्येष्ठ नगरसेविका शुभांगी पाटील, गणेश नाईक यांचे पुतणे वैभव नाईक यांच्या पत्नी वैष्णवी नाईक, तसेच अन्य नातेवाईक अदिती लीलाधर नाईक अशी अनेक नावे चर्चेत आहेत. यामध्ये नेत्रा शिर्के आणि शुभांगी पाटील या दोन्ही नगरसेविका अनुभवी असून, त्यांनी यापूर्वी स्थायी समिती सभापतीपद भूषवले आहे. त्यामुळे त्यांना प्राधान्य मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर राज्यातील राजकीय समीकरणे लक्षात घेता भरती पाटील यांचे नावही महत्त्वाचे मानले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in