‘नवी मुंबई मेट्रो' आजपासून धावणार मुख्यमंत्र्यांचे आदेश : उद‌्घाटनाशिवाय प्रवाशांच्या सेवेत

नवी मुंबई मेट्रो सेवा पेंधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेंधर दरम्यान दुपारी ३ वाजता सुरू होऊन शेवटची फेरी रात्री १० वाजता असणार आहे
‘नवी मुंबई मेट्रो' आजपासून धावणार मुख्यमंत्र्यांचे आदेश : उद‌्घाटनाशिवाय प्रवाशांच्या सेवेत

नवी मुंबई : नागरिकांचे हित लक्षात घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार ‘सिडको'तर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेंधर या मार्ग क्र.१ वर शुक्रवार, दि.१७ पासून लोकार्पण सोहळा न करता मेट्रो सेवेचा प्रारंभ करण्यात येणार आहे.

‘सिडको'तर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्प साकारण्यात येत आहे. या प्रकल्पात ४ उन्नत मार्ग विकसित करण्यात येत असून प्रथम बेलापूर ते पेंधर या ११.१० कि.मी. लांबीच्या मार्ग क्र.१ चे काम हाती घेतले होते. या मार्गावर एकूण ११ स्थानकांसह तळोजा पंचनंद येथे आगार (डेपो) आहे. या मार्गासाठी अभियांत्रिकी सहाय्य म्हणून ‘सिडको'तर्फे ‘महा मेट्रो'ची नियुक्ती करण्यात आली होती. ‘मेट्रो'च्या परिचालनासाठी सर्वात महत्त्वाची असलेली सीएमआरएस (मेट्रो रेल सुरक्षा आयुक्त) यांच्यातर्फे करण्यात आलेली चाचणी यशस्वी पार पडून मार्ग क्र.१ वर प्रवासी वाहतूक सुरू करण्याकरिता सीएमआरएस यांचे प्रमाणपत्र मिळाले.

नवी मुंबई मेट्रो सेवा पेंधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेंधर दरम्यान दुपारी ३ वाजता सुरू होऊन शेवटची फेरी रात्री १० वाजता असणार आहे, तर १८ नोव्हेंबरपासून पेंधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेंधर दरम्यान सकाळी ६ वाजता पहिली मेट्रो धावणार आहे. दोन्ही बाजूंकडून ‘मेट्रो'ची शेवटची फेरी रात्री १० वाजता होणार आहे. मार्ग क्र.१ वर दर १५ मिनिटांच्या अंतराने मेट्रो धावणार आहे.

तिकिटाचे दर १० ते ४० रुपयांदरम्यान

‘नवी मुंबई मेट्रो'च्या तिकिटाचे दर अंतरानुसार निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार ० ते २ कि.मी.च्या टप्प्याकरिता १० रुपये, २ ते ४ कि.मी.करिता १५ रुपये, ४ ते ६ कि.मी.साठी २० रुपये, ६ ते ८ कि.मी.करिता २५ रुपये, ८ ते १० कि.मी.करिता ३० रुपये आणि १० कि.मी.पुढील अंतराकरिता ४० रुपये निश्चित केले आहेत.

‘मेट्रो'द्वारे नवी मुंबई अंतर्गत उत्तम कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे. संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात मेट्रो मार्गांचे जाळे निर्माण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट असून नवी मुंबईमध्ये ‘सिडको'च्या माध्यमातून ‘मेट्रो'च्या अंमलबजावणीचे काम प्रभावीपणे सुरू आहे.’’-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

‘मेट्रो'च्या रूपाने नवी मुंबईकरांना जलद, पर्यावरणपूरक आणि आरामदायी परिवहनाचा एक सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे. खारघर, तळोजा नोड‌्सना ‘मेट्रो'द्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभणार आहे. नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय शहर या लौकिकाला साजेशी उत्तम आणि सक्षम परिवहन व्यवस्था ‘मेट्रो'द्वारे निर्माण होणार आहे.

-अनिल डिग्गीकर, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको.

logo
marathi.freepressjournal.in