...अन्यथा मी स्वतः जेट्टी नष्ट करेन; आमदार गणेश नाईक यांचा सिडको, कांदळवन अधिकाऱ्यांना इशारा

लवकरात लवकर उपाययोजना करा, अन्यथा मी स्वतः पोकलन जेसीबी चालवून जेट्टी नष्ट करेल, असा सज्जड दम गणेश नाईक यांनी दिला...
...अन्यथा मी स्वतः जेट्टी नष्ट करेन; आमदार गणेश नाईक यांचा सिडको, कांदळवन अधिकाऱ्यांना इशारा

नवी मुंबई : एनआरआय जेट्टीमुळे नवी मुंबई सागरीकिनाऱ्यावरील पाणथळ जमिनी मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत. यामुळे याठिकाणी हजारोंच्या संख्येने येणाऱ्या फ्लेमिंगो पक्षाचा अधिवास संपुष्टात आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सागरीकिनाऱ्यावरील पाणथळ जमिनी नष्ट झाल्याने फ्लेमिंगोच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. यावर लवकरात लवकर उपाययोजना करा, अन्यथा मी स्वतः पोकलन जेसीबी चालवून जेट्टी नष्ट करेल, असा सज्जड दम ऐरोलीचे आ. गणेश नाईक यांनी दिला आहे. फ्लेमिंगो मृत्यूच्या बातम्या दररोज पहावयास मिळत आहेत. त्यामुळे नाईक यांनी एनआरआय जेटीई परिसराची पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी सिडको अधिकारी आणि कांदळवन अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर एनआरआय फेस दोनच्या परिसरातील तलावात अनेक वर्षांपासून फ्लेमिंगोचे वास्तव्य आहे. ज्यात मुख्यत्वे फ्लेमिंगो पक्षांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. मात्र याच तलावाला लागून एका बोटीतून समुद्रमार्गे मुंबई, अलिबागकडे जाण्यासाठी जेट्टीची निर्मिती करण्यात आली आहे. याच जेट्टीच्या कामामुळे समुद्राचे पाणथळ तलावात येणारे पाणी अडले जाते. ज्यामुळे तलावातील पाण्यात घट झाली असून पाण्याचे प्रमाणा कमी असल्यामुळे फ्लेमिंगोचे येणे जवळपास बंद झाले आहे. त्यामुळे अन्नाच्या शोधार्थ फ्लेमिंगो पक्षी इतरत्र जात असल्याचे चित्र मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत आहे. मात्र हे फ्लेमिंगो इतरत्र जात असताना त्यांच्या जीवाला देखील धोक निर्माण होत असतो हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे.

फ्लेमिंगोचे शहर म्हणून नवी मुंबईची नवी ओळख निर्माण झाली आहे, ती फ्लेमिंगोंच्या सततच्या मृत्यूमुळे तसेच त्यांनी पाठ फिरवल्यामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने भाजप आमदार गणेश नाईक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी गुरुवारी त्या तलावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले.

अटल सेतू बनवण्यात आला आहे. एनआरआय जेट्टीपासून एखाद्या दुसऱ्या किलोमीटरवर बेलापूर जेट्टी आहे तरीही एनआरआय जेट्टी बांधली गेली यामागचे कारण अद्याप समजून आले नाही. मात्र या जेट्टीमुळे फ्लेमिंगो पक्षाचा अधिवास धोक्यात आला आहे. त्यातच सिडकोच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांना खुश करण्यासाठी पाणथळ जागेवर भराव टाकून भूखंड निर्मिती करीत खासगी बिल्डरांच्या खिशात घालण्याच्या तयारीत आहे. याची शहानिशा करण्यात येईल. मात्र येत्या आठ दिवसात जर पाणथळ जागेवर नैसर्गिकरित्या समुद्राचे पाणी आले नाही, तर मी स्वतः जेसीबी घेऊन पाण्यासाठी जागा करून देईल. यावेळी सिडकोचे मुख्य अभियंता एनसी बायस, नवी मुंबई मनपाचे अभियंता अरविंद शिंदे, माजी नगरसेविका नेत्रा शिर्के आणि मोठ्या प्रमाणावर पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते.

कांदळवनाची कत्तल करून काहीही गरज नसताना डांबरी रस्ता बनवण्यात आलेला आहे. तर ज्या नैसर्गिक नाल्यातून भरतीचे पाणी पाणथळ (तलाव) जागेत येते त्याच ठिकाणी डेब्रिज टाकल्याने नाला कोरडा ठाक पडला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

पामबीच रस्त्याने जाताना सहज डोळ्यांनी दिसणार नाही अशा जागेत भराव टाकून दोन भूखंड निर्माण निर्माण करण्यात आले आहेत. हीच जागा खासगी बिल्डरला विकण्यात येईल आणि पक्षाचा अधिवास संपेल अशी भीती नाईक यांनी व्यक्त केली. ज्या ठिकाणी हजारो फ्लेमिंगो पक्षांचा वावर असतो, सध्या त्या ठिकाणी पन्नासपेक्षा कमी फ्लेमिंगो असल्याचे गणेश नाईक यांनी केलेल्या पाहणीत आढळून आले.

"सिडकोने आपल्या विकास आराखड्यात, भावी विकासासाठी तलाव आधीच चिन्हांकित केले आहे. नगररचनाकार सिडको जैवविविधतेला मूठमाती देत निसर्गाशी खेळत आहे, हे खरोखरच दुर्दैवी आहे. नॅटकनेक्ट फाऊंडेशनच्या तक्रारीवरून केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने राज्याच्या पर्यावरण विभागाला सरोवराची तोडफोड केल्याच्या आरोपांची चौकशी करून अहवाल देण्यास सांगितले आहे." - बी. एन. कुमार ( संचालक नॅटकनेक्ट फाऊंडेशन)

"फ्लेमिंगोंचे शहर म्हणून नवी मुंबईची नवी ओळख निर्माण झाली आहे. काही नालायक अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे ही ओळख आणि फ्लेमिंगो पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तलावात पाण्याचा विसर्ग पुन्हा सुरू करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी सिडको आणि संबधित इतर विभागांना विनंती केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत फ्लेमिंगो नाहीसे होणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल. पर्यायाने कोणतेही भूमिका घ्यावी लागली तरी चालेल, पण तलावात समुद्राचे पाणी आणून नवी मुंबईची 'फ्लेमिंगो सिटी' ही ओळख कायम ठेवली जाणार असल्याचा आणि चुकीच्या धोरणाचा बीमोड करणार आहे." - गणेश नाईक, आमदार-ऐरोली

logo
marathi.freepressjournal.in