

नवी मुंबई : राज्यभरात ‘एमपीएससी’च्या विस्कळीत कारभारामुळे आणि रखडलेल्या परीक्षांमुळे राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांची आंदोलने सुरू असतानाच संभाजी ब्रिगेडने शुक्रवारी ‘एमपीएससी’चे सचिव महेंद्र हरपाळकर यांना काळे फासून निषेध व्यक्त केला.
नवी मुंबईतील सीबीडी येथील एमपीएससीच्या मुख्य कार्यालयात घडलेल्या घटनेत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी ‘एमपीएससी'चे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळे फासले. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिन्ही कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
या संपूर्ण घटनेची माहिती देताना पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले की, ‘संभाजी ब्रिगेड'च्या ३ कार्यकर्त्यांनी १० सप्टेंबर रोजी ‘एमपीएससी'चे सचिव महेंद्र हरपाळकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी काही महत्त्वाचे पुरावे द्यायचे आहेत, असे सांगून ११ सप्टेंबर रोजी पुन्हा भेटीची विशेष वेळ मागितली होती. त्यानुसार, ठरलेल्या वेळेत ते अधिकारी कक्षात दाखल झाले. आपल्या मोबाईल फोनमध्ये पुरावे असल्याचे सांगत त्यांनी आतमध्ये फोन नेला आणि पुरावे दाखवण्याच्या बहाण्याने एकाने अचानक सचिवांच्या तोंडाला काळे फासले.
दरम्यान, या संपूर्ण प्रकाराचे शुटींग तिसऱ्या व्यक्तीने मोबाईलमध्ये केले. या प्रकरणी पोलिसांनी सतर्कता दाखवत तिन्ही कार्यकर्त्यांना तात्काळ ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संभाजी ब्रिगेडचा सरकारला इशारा...
‘एमपीएससी'चे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळे फासल्यानंतर ‘संभाजी ब्रिगेड'चे महाराष्ट्र प्रवक्ते संतोष शिंदे यांनी सरकार आणि प्रशासनावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ‘एमपीएससी'चा अभ्यास करणाऱ्या २५ लाख विद्यार्थ्यांच्या आणि महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या वतीने ‘संभाजी ब्रिगेड'ने या भ्रष्ट व्यवस्थेच्या तोंडाला काळे फासले आहे. महेंद्र हरपाळकर यांच्या कानशिलात जी लगावली आहे, ती या बहिऱ्या आणि मुक्या सरकारला जनतेच्या वतीने मारलेली थप्पड आहे.
पुढचा नंबर अध्यक्षांचा
यापूर्वी ३ ऑगस्ट रोजी ‘संभाजी ब्रिगेड'च्या वतीने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलने करुन सरकारला आधीच इशारा दिला होता. मात्र, सरकार गेंड्याच्या कातडीचे असून त्यांना ज्या भाषेत समजेल त्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे. तसेच ‘एमपीएससी'च्या अध्यक्ष आणि सचिवांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही, तर पुढचा नंबर ‘एमपीएससी'च्या अध्यक्षांचा असेल, असा इशाराही शिंदे यांनी दिला.
अध्यक्षांसह सचिवांनी राजीनामा द्यावा - आदित्य ठाकरे
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची भेट घेतली. एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिवांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली. विशेष तपास पथकाऐवजी उच्चस्तरीय न्यायिक चौकशी समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.