पाणीबिल वसुलीसाठी महापालिकेची धडक कारवाई; ३ हजार ग्राहकांना नळजोडणी खंडित करण्याची नोटीस

नवी मुंबई महापालिका पाणीपुरवठा विभागामार्फत पाणीबिल वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे.
पाणीबिल वसुलीसाठी महापालिकेची धडक कारवाई; ३ हजार ग्राहकांना नळजोडणी खंडित करण्याची नोटीस

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका पाणीपुरवठा विभागामार्फत पाणीबिल वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. यानुसार नोटिसा बजावूनही पाणीबिल न भरणाऱ्या थकबाकीदार ग्राहकांची नळजोडणी खंडित करण्यात येत आहे, अशी माहिती महापालिका अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील यांनी दिली.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांना महापालिकेच्या मोरबे धरणातून ३८३ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा तसेच एमआयडीसीद्वारे ६८ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. नवी मुंबईमधील रहिवाशांना दररोज एकूण ४५१ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. मोरबे धरणातील पाणी शुद्ध करून महापालिकेच्या सीबीडी ते दिघापर्यंतच्या क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यातून पाणी पुरवण्याकरिता कोट्यवधी रुपयांचा खर्च होत आहे. त्या तुलनेत नवी मुंबईमध्ये सर्वच नळजोडणी ग्राहकांना अल्प प्रमाणात पाणीबिल आकारले जात आहे. या पार्श्वभूमीवर काही ग्राहकांकडून पाणीबिल भरण्यास टाळाटाळ केली जाते किंवा पाणी बिल अनेक महिने प्रलंबित ठेवले जाते. त्यामुळे प्रत्येक दोन महिन्यांच्या बिल सायकलनंतर पाणीपुरवठा विभागाकडून संबंधित अधिक थकबाकी असलेल्या ग्राहकांवर नळजोडणी खंडित करण्याची कटू कारवाई करण्याची वेळ येते.

सध्या पाणी बिल न भरणाऱ्या २ हजार ८९२ ग्राहकांना नळजोडणी खंडित करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. या ग्राहकांकडे एकूण थकीत पाणीबिल २७ कोटी ४१ लाख रुपये होते. नोटीस बजावण्यात आल्यावर नोटिसीची मुदत संपताच महापालिकेचे नळजोडणी खंडित करणारे पथक संबंधित ग्राहकाच्या घरी धडकत होते. तसेच थकबाकी भरल्याचे बिल दाखवण्याची मागणी ग्राहकाकडे करून थकबाकी न भरल्याने नळजोडणी खंडित करण्यासाठी आल्याची सूचना ग्राहकांना दिली जात होती. आता आपले पाणीच बंद होणार असल्याचे लक्षात घेऊन शेकडो ग्राहकांनी त्वरित ऑनलाईन किंवा ऑफलाईन पाणीबिल भरून महापालिका कर्मचाऱ्यांना दिले. परिणामी अनेकांच्या नळजोडणी खंडित न होता केवळ पथक कारवाईला आले आहे, असे निदर्शनास येताच पाणीबिल थकबाकीदारांनी त्वरित पाणी देयके भरल्याने कोट्यवधी रुपयांची पाणीबिलाची वसुली झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in