

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या आस्थापनेवरील गट-क आणि गट-ड मधील ३० संवर्गातील ६६८ पदांच्या भरती प्रक्रियेचा निकाल जाहीर करण्याचा मार्ग मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे अखेर मोकळा झाला आहे. पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबरला उमेदवारांचे स्कोअर कार्ड पालिकेच्या www.nmmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहेत.
कर्मचाऱ्यांना संरक्षण
महापालिकेत सध्या कार्यरत असलेल्या ४७७ कंत्राटी/करार पद्धतीतील कर्मचाऱ्यांच्या सेवेला कोणतीही बाधा न आणण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांची पदे वगळून केवळ उर्वरित उपलब्ध रिक्त पदांवरच नवीन उमेदवारांना सरळसेवेने नियुक्ती दिली जाईल. न्यायालयाने जाहिरात व च्या शुद्धिपत्रकानुसार झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास महापालिकेला परवानगी दिली आहे.
६६८ पदांसाठी जुलै २०२५ मध्ये झालेल्या ऑनलाईन परीक्षेला ६८,१४९ उमेदवार उपस्थित होते. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे न्यायालयाने ऑगस्ट २०२५ मध्ये निकालाला अंतरिम स्थगिती दिली होती. आता न्यायालयाच्या ताज्या आदेशानुसार ११ सप्टेंबरला स्कोअरकार्ड प्रसिद्ध होत असून प्रलंबित कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाबत अंतिम निर्णय झाल्यानंतर उर्वरित पदांवरील नेमणुकीचा निर्णय घेतला जाणार आहे.