एटीव्हीएम मशिन्स प्रवाशांच्या सेवेत; नेरुळ रेल्वे स्थानकातील बंद तिकीट खिडक्या अखेर सुरू

नवशक्तिच्या बातमीनंतर रेल्वे प्रशासनाकडून दखल, स्टेशन प्रबंधकांची माहिती
एटीव्हीएम मशिन्स प्रवाशांच्या सेवेत; नेरुळ रेल्वे स्थानकातील बंद तिकीट खिडक्या अखेर सुरू

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर प्रतिदिन प्रवाशांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. नवी मुंबई शहरात सिडको प्रशासनाने भव्यदिव्य, चांगल्या दर्जाची स्थानके उभारली असली तरी अनेक स्थानकांवर सोयीसुविधा अपूर्ण आहेत. यापैकीच नेरूळ रेल्वे स्थानकातील अपुऱ्या तिकीट खिडक्या, कर्मचाऱ्यांचा अभाव याबाबत प्रवाशांच्या तक्रारीनंतर 'दैनिक नवशक्ति' वृत्तपत्राने याकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याची तात्काळ दखल घेत अवघ्या दोन आठवड्यात नेरूळ रेल्वे स्थानकातील पूर्व-पश्चिमेकडील बंद तिकीट खिडक्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच तांत्रिक बिघाड असलेले एटीव्हीएम मशिन्स देखील कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती स्टेशन प्रबंधक नायर यांनी दिली आहे.

हार्बर मार्गावरील नेरूळ रेल्वे स्थानकातून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. मात्र स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिमेला केवळ एक-एक तिकीट खिडकी कार्यरत असल्याने प्रवाशांच्या दररोज लांबच्या लांब रांगा दिसून येतात. स्थानकातील एटीव्हीएम मशिन्स देखील बंद असल्याने २०-२० मिनिटे रांगेत उभे राहावे लागत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले. नेरूळ स्थानक हे वाशी ते पनवेल रेल्वे स्थानकादरम्यानचा मध्यबिंदू आहे. एमआयडीसी, खासगी कंपन्या कॉर्पोरेट क्षेत्रामुळे हजारो प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात. त्यामुळे नेरूळ स्थानकावर प्रवाशांची कायम वर्दळ पाहायला मिळते. मात्र सर्वाधिक गर्दीच्या या स्थानकात पूर्व आणि पश्चिम बाजूला असलेल्या एकूण १० तिकीट खिडक्यांपैकी केवळ एक-एक तिकीट खिडक्या सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. तर दुसऱ्या बाजूला ६ एटीव्हीएम मशिन्सपैकी केवळ २ मशिन्स सुरू असल्याने दररोज तिकीट खिडक्यांवर तसेच एटीव्हीएम मशिन्ससाठी प्रवाशांच्या लांबच्या लांबच रांगा लागलेल्या दिसून यायच्या. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली.

प्रवाशांच्या तक्रारीनंतर 'नवशक्ति' वृत्तपत्राने याबाबत बातमी प्रसिद्ध करत स्टेशन प्रबंधक नायर यांच्याशी संपर्क साधला. यावेळी कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने तिकीट खिडक्या बंद असल्याचे नायर यांनी सांगत लवकरच तिकीट खिडक्या कार्यान्वित करण्यात येतील असे आश्वासन दिले. त्यानुसार अवघ्या दोन आठवड्यातच नेरुळ रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूकडील बंद तिकीट खिडक्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत स्थानकात एकूण ६ खिडक्या प्रवाशांच्या सेवेत असून ४ एटीव्हीएम मशिन्स देखील उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामुळे मंगळवारी २५ एप्रिल रोजी तिकीट खिडक्यांवर गर्दीचे विभाजन दिसून आले. तसेच प्रवाशांना ताटकळत थांबावे लागत नसल्याने जलद प्रवास होण्यास मदत झाल्याचे निदर्शनास आले.

"नेरुळ स्थानकातील समस्यांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर योग्य नियोजन करत पुरेशा तिकीट खिडक्या, एटीव्हीएम मशिन्स उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्रवाशांचा प्रवास जलद व्हावा हेच आमचे उद्दिष्ट आहे."

- एस.एम. नायर, स्टेशन प्रबंधक, नेरुळ रेल्वे स्थानक

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in