नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांना ४५ हजारांचे सानुग्रह अनुदान; महासभेची मंजुरी

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, कंत्राटी कामगार आणि आशा स्वयंसेविकांसह विविध कर्मचारी घटकांना प्रत्येकी ४५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या महासभेत मंजूर करण्यात आला.
नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांना ४५ हजारांचे सानुग्रह अनुदान; महासभेची मंजुरी
नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांना ४५ हजारांचे सानुग्रह अनुदान; महासभेची मंजुरीसंग्रहित छायाचित्र
Published on: 

नवी मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, कंत्राटी कामगार आणि आशा स्वयंसेविकांसह विविध कर्मचारी घटकांना प्रत्येकी ४५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या महासभेत मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार असून, महापालिकेच्या तिजोरीवर सुमारे २३ कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे. तसेच कंत्राटी कामगारांना ७ हजार ५०० रुपयांचे अतिरिक्त आर्थिक सहाय्य जूनपासूनच्या थकबाकीसह मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सभागृहनेते सागर नाईक यांनी सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव मांडला. सर्व स्तरांतील कर्मचाऱ्यांना समान आर्थिक लाभ मिळावा आणि कोणताही कर्मचारी दिवाळीच्या आनंदापासून वंचित राहू नये, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वनमंत्री गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून हा प्रस्ताव पुढे आल्याचेही त्यांनी नमूद केले. महापौर सुजाता पाटील यांनी प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याची घोषणा केली. गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना ३४ हजार ५०० रुपये अनुदान देण्यात आले होते. यंदा ही रक्कम ४५ हजार रुपये करण्यात आली आहे. ज्येष्ठ नगरसेवक शिवराम पाटील यांनी अनुदानाची रक्कम ५० हजार रुपये करण्याची मागणी केली. महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या १४ गावांतील कर्मचाऱ्यांनाही या निर्णयाचा लाभ देण्यात येणार आहे.

आशा स्वयंसेविकांनाही लाभ

या निर्णयाचा लाभ नियमित अधिकारी-कर्मचारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, शालेय पोषण आहार कर्मचारी, कंत्राटी कामगार आणि विविध शासकीय योजनांतील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. आरोग्य विभागातील १ हजार २४८ कामगार, कोविड व बिगरकोविड विभागांतील ३२९ कामगार आणि २४३ आशा स्वयंसेविकांचाही यात समावेश आहे.

२३ कोटी रुपये खर्च अपेक्षित

कंत्राटी कामगारांना ७ हजार ५०० रुपयांचे अतिरिक्त आर्थिक सहाय्य देण्यातील कायदेशीर अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाने तज्ज्ञांचा सल्ला घेतला. अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या माहितीनुसार, सध्या ५ हजार १२१ कर्मचाऱ्यांसाठी सुमारे २३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. अर्थसंकल्पीय तरतुदींची पुनर्रचना करावी लागणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in