

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेतील धोकादायक इमारतींचे २०२६-२०२७ या वर्षासाठी विभागवार सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणानंतर महानगरपालिका क्षेत्रात एकूण ५०४ इमारती या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम २६४ अन्वये धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत.
यात अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्कासित करणे अशा ‘सी-१’ प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या ५२ इमारती तसेच इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरूस्ती करणे अशा ‘सी-२ ए’ प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या १०२ इमारती आणि इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती करणे अशा ‘सी-२ बी’ प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या २९७ इमारती त्याचप्रमाणे इमारतीची किरकोळ दुरुस्ती या ‘सी-३’ प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या ५३ इमारती, अशाप्रकारे एकूण ५०४ धोकादायक इमारतींची यादी घोषित करण्यात आलेली आहे.
वेबसाईटवर यादी उपलब्ध
यादी नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटवर 'विभाग' श्रेणीमध्ये 'अतिक्रमण विभाग' माहितीच्या सेक्शनमध्ये सामान्य माहिती या अंतर्गत अवलोकनासाठी सहज उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तुम्ही वरील लिंकवर क्लिक करूनही यादी पाहू शकता. या यादीमध्ये अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्कासित करण्याच्या ‘सी–१’ प्रवर्गामध्ये नमूद ५२ इमारतींची नावे व तपशील नागरिकांना सहज कळावा यादृष्टीने ठळक अक्षरात प्रसिध्द करण्यात आलेला आहे.