

नवी मुंबई : आकर्षक मासिक परतावा, भरघोस कमिशन आणि डायमंड गिफ्टचे आमीष दाखवून तब्बल ४ हजार ५०० गुंतवणूकदारांची ४७ कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या बनावट गुंतवणूक योजनेचा नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुप्तवार्ता युनिटने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी ऑसम स्वदेश एलएलपी या कंपनीच्या सीएमडीसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी सुनील पालवे आणि एजंट नवनाथ रेपोळे या दोघांना अटक केली आहे.
नवी मुंबई पोलिसांच्या एफआययुला या प्रकरणाची निनावी तक्रार प्राप्त झाली होती. त्यानंतर एफआययू युनिटने तपास सुरू केला असता, ऑसम स्वदेश एलएलपी कंपनीचे पदाधिकारी आणि एजंट नागरिकांना गुंतवणुकीवर दरमहा आकर्षक परतावा, कमिशन तसेच डायमंड गिफ्ट देण्याचे आमीष दाखवून पैसे गोळा करत असल्याचे उघड झाले. या कंपनीने सुरुवातीच्या काळात काही गुंतवणूकदारांना ठरलेला परतावा देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक स्वीकारल्यानंतर परतावा देणे बंद केले. प्राथमिक तपासात सुमारे ४,५०० गुंतवणूकदारांकडून ४७ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करण्यात आली असून त्यातील मोठ्या प्रमाणावर निधीचा अपहार झाल्याचे समोर आले आहे.
विविध कलमांखाली गुन्हे दाखल
या प्रकरणी सीएमडी सुनील पालवे, मार्केटिंग डायरेक्टर जयदेव गंभे, आशीष बर्वे, अमोल जाधव, एजंट नवनाथ रेपोळे, दिनेश कोळंबे तसेच कंपनीचे इतर प्रतिनिधी आणि एजंट यांच्याविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात कलम ३१६(५), ३१८(४), ३(५) तसेच बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध अधिनियम, २०१९ मधील कलम ३, ५ आणि ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एफआययू युनिट आणि गुन्हे शाखेच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली. त्याबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.
गुंतवणूकदारांनी पोलिसांशी संपर्क साधावा
या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सदाशिव निकम करत असून आर्थिक व्यवहार, कंपनीची कागदपत्रे, बँक खात्यांचा तपशील, निधीचा प्रवाह आणि इतर संभाव्य फसवणूकग्रस्त गुंतवणूकदारांचा शोध सुरू आहे. या कंपनीकडून फसवणूक झालेल्या इतर नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.