

नवी मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन केले जाते. त्यात रेव्ह पार्ट्या छुप्या पध्दतीने आयोजित केल्या जातात. या रेव्ह पार्ट्यामध्ये अमली पदार्थांचे सर्रासपणे सेवन केले जाते. तसेच मद्यपींचा धुडगूसही मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे थर्टी फर्स्ट दरम्यान, शहरात कुठलाही प्रकारची अनुचित व अप्रिय घटना घडू नये, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नवी मुंबई पोलिसांची अशा पार्ट्यांच्या आयोजनावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
नव वर्षांच्या स्वागतासाठी आणि त्या अनुषंगाने आवश्यक बंदोबस्तासाठी नवी मुंबई पोलिसांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. थर्टीफर्स्ट निमित्त ठिकठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले जात असून अनेक पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थाचा वापर होत असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे अंमली पदार्थ पुरविणाऱ्या तस्करांची माहिती काढण्यासाठी पोलिसांच्या खबऱ्यांचे नेटवर्क कामाला लागले आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्राअंतर्गत नवी मुंबई व पनवेल परिसरातील हॉटेल्स, धाबे, कॉटेजेस, फार्म हाऊस, जंगल परिसरातील पार्ट्यांची ठिकाणे, समुद्र किनारपट्टीची ठिकाणे येथे अनुचित प्रकार अथवा गैरकृत्य होणार नाही याकडे पोलिसांकडून लक्ष ठेवले जाणार आहे. त्यातही विशेष करुन छुप्या पद्धतीने आयोजित केल्या जाणाऱ्या रेव्ह पाट्यांवर पोलिसांनी विशेष लक्ष ठेवले आहे.
रेव्ह पाटर्यांमध्ये अमली पदार्थाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे तस्करी वाढते. मागील काही वर्षात नववर्ष स्वागताच्या काळात नवी मुंबई पोलिसांनी कोकेन, एमडी, एलएसडी, गांजा यासारखे अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात छापे मारुन पकडले आहेत.