नवी मुंबई पोलिसांची 'सायलेन्सर' कारवाई, सामान्य नागरिकांकडून प्रशंसा

नवी मुंबई पोलीस वाहतुक विभाग हेल्प लाईन नंबर 7738393839 वर संपर्क साधून अथवा व्हॉट्सॲपद्वारे देण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
नवी मुंबई पोलिसांची 'सायलेन्सर' कारवाई, सामान्य नागरिकांकडून प्रशंसा

नंदकुमार ठोसर

नवी मुंबई : आजकालच्या तरुणांमध्ये बाइकचं प्रचंड वेड आहे, बाईकला मोठा आवाज असलेले सायलेन्सर लावण्याचा तरुणांमध्ये जणू ट्रेंडच आला आहे. मात्र या सायलेन्सरच्या आवाजाने ध्वनी प्रदूषण होत असल्याने व रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होत असल्याने मोठ्या आवाजातील सायलेन्सर असलेल्या गाड्यांना अनेक ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी देखील कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी वाहनावर कारवाई करून त्यांचे सायलेंसर जप्त करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या 82 सायलेन्सरवर शुक्रवारी दुपारी रोड रोलर चालवून ते नष्ट करण्याची कारवाई वाहतूक पोलीसांनी केली. यावेळी वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पुरुषोत्तम कराड व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बुलेट गाडीला कंपनीकडून लावण्यात आलेले सायलेन्सर काढून अनेक जण कर्णकर्कश आणि कानठळ्या बसवणारे सायलेन्सर लावतात. या सायलेन्सरमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत असल्याने या तक्रारीची दखल घेऊन नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी सायलेन्सर लावण्यात आलेल्या दुचाकीवर कारवाईला सुरुवात केली आहे. त्यासाठी नवी मुंबई वाहतूक विभागाने नवी मुंबईच्या हद्दीत विशेष मोहीम राबवून 82 दुचाकी वाहनाचे सायलेन्सर कापून जप्त केले आहेत. या मोहिमेत सर्वात जास्त सीवूड्स वाहतूक शाखेने पाम बीच मार्गावर सायलेन्सर असलेल्या दुचाकी वाहनावर कारवाई करून त्यांचे सायलेन्सर जप्त केले आहेत. या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेले 82 सायलेंसरवर शुक्रवारी दुपारी सीबीडी येथील नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोरील सर्व्हिस रोडवर रोड रोलर चालवून ते नष्ट करण्यात आले. सदर ची कारवाई मोटार वाहन कायदा कलम 190(2),198 नुसार करण्यात आली. वाहतूक विभागाकडून नवी मुंबई पोलीस आयुक्तलाय हद्दीमध्ये 10 जून पासुन सायलेन्सर लावण्यात आलेल्या दुचाकी वाहनाविरोधात विषेश मोहिम सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना अशा प्रकारे नियमांचे उल्लघंन करुन सायलेन्सर लावण्यात आलेल्या दुचाकी आढळून आल्यास त्याची माहिती, त्यांनी नवी मुंबई पोलीस वाहतुक विभाग हेल्प लाईन नंबर 7738393839 वर संपर्क साधून अथवा व्हॉट्सॲपद्वारे देण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. सायलेन्स असलेल्या दुचाकीची माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुपित ठेवण्यात येणार असल्याचे देखील वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


तरुण मुलं मोठ्या आवाजातील सायलेंसर लावलेल्या बाइक चालवतात. अशाप्रकारच्या बाईकमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याने बाईकला लावण्यात आलेले मोठ्या आवाजातील सायलेंसर काढून जप्त करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असून ही कारवाई टाळायची असल्यास, ज्यांनी आपल्या बुलेटला मॉडिफाइड सायलेन्सर लावून घेतले आहेत, त्यांनी ते स्वतःहून काढून टाकावेत. अशा पद्धतीचे सायलेन्सर बसवून देणाऱ्या गॅरेजवाल्यावर देखील कडक कारवाई करण्यात येणार आहे.
पुरुषोत्तम कराड

पोलीस उपायुक्त ( नवी मुंबई वाहतूक विभाग )

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in