गुन्हेगारी रोखण्यात नवी मुंबई पोलिसांना यश, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांचा दावा

सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईमध्ये २०२३ या वर्षामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत, मालमत्ता विषयक, फेटल अपघात, महिला अत्याचार यासारख्या गुन्ह्यात घट झाली असली तरी सायबर गुन्ह्यांचा आलेख चढताच राहिला आहे.
गुन्हेगारी रोखण्यात नवी मुंबई पोलिसांना यश, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांचा दावा
Published on

नवी मुंबई : सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईमध्ये २०२३ या वर्षामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत, मालमत्ता विषयक, फेटल अपघात, महिला अत्याचार यासारख्या गुन्ह्यात घट झाली असली तरी सायबर गुन्ह्यांचा आलेख चढताच राहिला आहे. मात्र, गत वर्षात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी एकही घटना घडली नाही, तसेच कुठल्याही प्रकारची जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणारी घटना घडली नसल्याचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २०२३ मध्ये महिला विषयक दाखल झालेल्या एकूण ७०३ गुन्ह्यांपैकी ६८९ (९८ टक्के) गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. २०२२ च्या तुलनेत महिला विषयक गुन्हे ५९ ने कमी झाल्याचे दिसून येत आहे. २०२३ मध्ये बलात्काराचे एकूण २९९ गुन्हे दाखल झाले असून यातील सर्व गुन्हे उघडकीस आले आहेत. २०२२ च्या तुलनेत २०२३ मधील बलात्काराच्या गुन्ह्यात ४२ ने घट झाली आहे. तसेच २०२३ मध्ये अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या दाखल पोक्सोच्या एकूण १२३ गुन्ह्यातील सर्व गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये पोक्सोच्या गुन्ह्यात ७ ने घट झाल्याचे आकडेवारीत दिसून येत आहे. २०२३ मध्ये विनयभंगाचे ३८५ गुन्हे घडले असून त्यापैकी ३७१ गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्यात २०२२ च्या तुलनेत २२ ने घट झाल्याचे दिसून येत आहे. तसेच सासरकडील मंडळीकडून होणाऱ्या छळवणुकीच्या गुन्ह्यात घट झाल्याचे दिसून येत असले तरी महिलांची छळवणूक, हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त केल्यासंबधीच्या गुन्ह्यात १४ ने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

२०२३ मध्ये शरीराविरुद्धच्या एकूण ८२५ दाखल गुन्ह्यांपैकी ८०७ (९८ टक्के) उघडकीस आले आहेत. २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये शरीराविरुद्धच्या गुन्ह्यात ७५ ने घट झाली आहे. यात २०२३ मध्ये खुनाचे ३७ गुन्हे घडले असून त्यातील ३४ गुन्हे उघडकीस आले आहेत. २०२२ च्या तुलनेत खुनाच्या गुन्ह्यात २ ने घट झाली आहे. तर खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यात १० ने वाढ झाली आहे. फसवणुकीचे ८१२ गुन्हे घडले असून त्यापैकी ४६२ गुन्हे उघडकीस आले आहेत. २०२२ च्या तुलनेत आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात १४९ ने वाढ झाली आहे. यात ठकबाजीचे ४४५ गुन्हे दाखल असून त्यातील ३६९ गुन्हे उघडकीस आले आहेत. विश्वासघाताचे ५६ गुन्हे दाखल असून त्यापैकी ५३ उघडकीस आले आहेत. २०२३ मध्ये पोलीस बतावणीच्या ८ घटना घडल्या असून या गुन्ह्यात २०२२ वर्षाच्या तुलनेत १२ ने घट झाल्याचे दिसून येत आहे. मालमत्तेविषयक २३४८ दाखल गुन्ह्यांपैकी ११७० (५० टक्के) गुन्हे उघडकीस आले आहेत. २०२२ च्या तुलनेत ९९ ने घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. एकूण आकडेवारीवरून नवी मुंबई पोलिसांची २०२२ वर्षाच्या तुलनेत २०२३ मध्ये गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रमाणात ६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in