

नवी मुंबई : नवी मुंबईतील वेगाने वाढणाऱ्या पायाभूत सुविधांच्या आणि विकास प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर क्रेडाई-बॅनमने २४ व्या नवी मुंबई प्रॉपर्टी एक्स्पोची घोषणा केली. 'नवी मुंबई रन टू द फ्युचर' या आकर्षक घोषवाक्यासह वाशी सिडको एक्झिबिशन सेंटर येथे १२ ते १५ डिसेंबरदरम्यान हा भव्य रिअल इस्टेट महोत्सव पार पडणार आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत याची माहिती देण्यात आली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मेट्रो, कोस्टल रोड, विरार-अलिबाग मल्टी-मॉडल कॉरिडॉर यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे नवी मुंबई देशातील सर्वात आशादायी रिअल इस्टेट डेस्टिनेशन म्हणून उदयास येत आहे.
पायाभूत सुविधांतील झपाट्याने होणाऱ्या बदलांमुळे घर खरेदीदारांसमोर प्रचंड संधी निर्माण झाल्या आहेत. या वाढीचा फायदा घर खरेदीदार आणि गुंतवणूकदारांना थेट मिळावा, हा एक्स्पोचा उद्देश असल्याचे क्रेडाई-बॅनमने स्पष्ट केले.
या एक्स्पोसाठी ई.व्ही. होम्स हे टायटल प्रायोजक असून पॅराडाईज ग्रुप आणि एम्पेरिया ग्रुप मुख्य प्रायोजक आहेत. गामी ग्रुप आणि श्रीजी व्हेंचर सह-प्रायोजक म्हणून सहभागी आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया अधिकृत बँकिंग भागीदार आहे.
या वर्षीच्या एक्स्पोचे नेतृत्व संयोजक महेश पटेल आणि सह-संयोजक झुबिन संघोई व हितेश गामी करत असून पिरॅमिड रिअल इस्टेटची टीम महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यांच्या नाविन्यपूर्ण नियोजनामुळे घर खरेदीदार, विकासक आणि गुंतवणूकदारांसाठी एक्स्पोचा अनुभव अधिक समृद्ध होणार आहे. नवी मुंबईच्या विकसित होत असलेल्या ओळखीचा उत्सव मानले जाणारे हे प्रदर्शन हजारो नागरिकांसाठी स्वप्नातील घर मिळवण्याचे प्रमुख व्यासपीठ ठरणार आहे.
एकाच छताखाली ५०० हून अधिक प्रकल्प
या एक्स्पोत ५० हून अधिक प्रमुख विकासक सहभागी होणार असून, ५०० पेक्षा अधिक निवासी, व्यावसायिक, टाऊनशिप आणि लक्झरी प्रकल्पांचे प्रदर्शन होईल. परवडणारे, मध्यम आणि प्रीमियम गृहप्रकल्प यांसह कर्ज सुविधा, गुंतवणूक मार्गदर्शन आणि वित्तीय संस्थांसाठी स्वतंत्र झोनही उपलब्ध असेल. नवी मुंबईतील सर्वात विश्वसनीय विकासकांकडील क्युरेटेड ऑफर्स याठिकाणी पाहता येतील.
जनजागृतीसाठी चर्चासत्र
नवी मुंबईत पुनर्विकासाची लाट असून शासनाकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. "वॉक टू वर्क" ही संकल्पना रुजवणाऱ्या या नव्या विकासअनुषंगाने नागरिकांसाठी योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. त्यासाठी १४ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शन स्थळी पुनर्विकास विषयावरील विशेष चर्चासत्राचे आयोजन केले आहे. गृहनिर्माण संस्था सदस्य व सर्वसामान्य नागरिकांसाठी हे सत्र उपयुक्त ठरणार आहे.
एक्स्पोमध्ये लकी ड्रॉ
पर्यटकांचा उत्साह वाढवण्यासाठी एक्स्पोमध्ये स्पॉट-बुकिंग करणाऱ्या दोन भाग्यवान विजेत्यांना प्रत्येकी एक कार देण्यात येणार आहे. त्यामुळे स्वप्नातील घरांसह आकर्षक भेटी जिंकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.