Navi Mumbai : कर्तव्य संपले... पण माणुसकी नाही; रबाळे वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने बेशुद्ध कारचालकाला जीवदान

कर्तव्याची वेळ संपल्यानंतरही माणुसकीचे कर्तव्य पार पाडत रबाळे वाहतूक शाखेतील दोन पोलीस शिपायांनी प्रसंगावधान दाखवत बेशुद्ध कारचालकाचे प्राण वाचविल्याची हृदयस्पर्शी घटना घडली आहे.
Navi Mumbai : कर्तव्य संपले... पण माणुसकी नाही; रबाळे वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने बेशुद्ध कारचालकाला जीवदान
Navi Mumbai : कर्तव्य संपले... पण माणुसकी नाही; रबाळे वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने बेशुद्ध कारचालकाला जीवदान
Published on

नवी मुंबई : कर्तव्याची वेळ संपल्यानंतरही माणुसकीचे कर्तव्य पार पाडत रबाळे वाहतूक शाखेतील दोन पोलीस शिपायांनी प्रसंगावधान दाखवत बेशुद्ध कारचालकाचे प्राण वाचविल्याची हृदयस्पर्शी घटना घडली आहे. त्यांच्या या धाडसी आणि तत्पर कृतीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

१७ जुलै रोजी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास रबाळे वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई सचिन ढाले आणि सचिन सुळ हे दोघे घरी जात होते. त्यावेळी रबाळे येथील रिलायन्स उड्डाणपुलाच्या बेलापूर लेनवर कार दुभाजकावर आदळल्याचे दिसले. त्यामुळे दोन्ही पोलिसांनी कारजवळ जाऊन पाहणी केली असता चालक बेशुद्ध अवस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोन्ही पोलिसांनी तत्काळ त्या चालकाला सीपीआर दिल्यामुळे काही क्षणांतच चालकाला शुद्ध आली. यानंतर त्यांनी विलंब न लावता चालकाला तातडीने रबाळे येथील गवळी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान चालकाने आपले नाव सचिन बिचुकले असल्याचे तसेच ते सानपाडा येथील मोराज रेसिडेन्सीमध्ये राहण्यास असल्याचे सांगितले. बिचुकले हे लार्सन ॲॅण्ड टुब्रो कंपनीत नोकरीला आहेत. ते ऑफिस वरून सानपाडा येथील घरी जात असताना, हा प्रकार घडला.

त्याचवेळी त्यांच्या मोबाईलवर पत्नी अंजली बिचुकले यांचा फोन आला असता, पोलिसांनी त्यांना घडलेला प्रकार समजावून सांगितला. तसेच बिचुकले यांना सुरक्षितपणे रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी, १८ जुलै रोजी, पोलिसांनी रुग्णालयात जाऊन बिचुकले यांची विचारपूस केली. त्यावेळी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समोर आले. यावेळी सचिन बिचुकले यांनी, दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी योग्य वेळी मदत केली नसती, तर आज मी जिवंत नसतो. त्यांच्या तत्परतेमुळे माझे प्राण वाचले, अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे आभार मानले.

नवी मुंबई पोलिसांसाठी अभिमानास्पद

सचिन ढाले, सचिन सुळे यांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आमचे कर्मचारी तत्पर आहेत, असे रबाळे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन बडगुजर यांनी सांगितले. कर्तव्य संपल्यानंतरही अनोळखी व्यक्तीचा जीव त्यांनी वाचवला आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in