

नवी मुंबई : बोरिवली येथे लोकल ट्रेनमध्ये एका तरुणाची हत्येनंतर मुंबई लोहमार्ग पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर वाशी रेल्वे पोलिसांनी आपल्या हद्दीतील सर्व रेल्वे स्थानकांवर सरप्राईज चेकिंग मोहीम सुरू केली आहे. मंगळवारी दुपारी वाशी रेल्वे स्थानकात पोलिसांनी प्रवाशांच्या बॅगांची तपासणी केली. यावेळी संशयास्पद वस्तू घेऊन प्रवास करणाऱ्या तसेच मद्यसेवन करून वावरणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली.
लोकलमध्ये चाकू, सुरा, कात्री किंवा अन्य घातक शस्त्र, तसेच ज्वलनशील अथवा स्फोटक पदार्थ घेऊन कुणी वावरू नये, यासाठी वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व रेल्वे स्थानकांवर रेल्वे पोलिसांकडून प्रवाशांच्या बॅगांची तपासणी करण्यात येत आहे.
मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व रेल्वे स्थानकांवर ही व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्येकाच्या बॅगांची तपासणी केली जात आहे.