भरधाव कारच्या धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू

पनवेल येथून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दोन रिक्षांना जोरदार धडक दिली.
भरधाव कारच्या धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू
Published on

नवी मुंबई : पनवेल येथून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दोन रिक्षांना जोरदार धडक दिली. या धडकेत एका रिक्षामध्ये झोपलेल्या चालकाचा मृत्यू झाल्याची घटना सायन-पनवेल मार्गावर जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ घडली. या अपघातात दोन्ही रिक्षांचा चक्काचूर झाला असून याप्रकरणी नेरूळ पोलिसांनी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

या अपघातात मृत झालेल्या रिक्षाचालकाचे नाव घनश्याम जैस्वाल (५०) असे असून तो तुर्भे नाका येथील शांतीनगरमध्ये राहण्यास होता. घनश्याम जैस्वालने रात्रभर रिक्षा चालवली होती. त्यामुळे २९ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास त्याने सायन-पनवेल मार्गावरील जुईनगर रेल्वे स्टेशन जवळच्या बस स्टॉपवर आपली रिक्षा उभी करून त्यात झोपला होता. यावेळी पहाटेच्या सुमारास राजेंद्र वनकळस त्याचठिकाणी आपल्या मुलासह रिक्षा घेऊन चहा पिण्यासाठी आले होते. याचवेळी पनवेल येथून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या घनश्याम आणि राजेंद्र या दोघांच्या रिक्षांना जोरात धडक दिली. या अपघातात रिक्षामध्ये झोपलेले घनश्याम जैस्वाल यांचा जागीच मृत्यू झाला. राजेंद्र आणि त्यांचा मुलगा घटनेच्या काही मिनिटापूर्वी रिक्षातून उतरल्याने ते या अपघातातून थोडक्यात बचावले.

logo
marathi.freepressjournal.in