परीक्षेत मदत केली नाही म्हणून बेदम मारहाण

नवी मुंबईतील नेरूळ भागात असणाऱ्या एका महाविद्यालयात परीक्षा सुरू आहेत. याच परीक्षेदरम्यान उत्तरे दाखवून मदत न केल्याचा राग आल्याने...
परीक्षेत मदत केली नाही म्हणून बेदम मारहाण
(संग्रहित छायाचित्र)
Published on

नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरूळ भागात असणाऱ्या एका महाविद्यालयात परीक्षा सुरू आहेत. याच परीक्षेदरम्यान उत्तरे दाखवून मदत न केल्याचा राग आल्याने मदत न करणाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्या विद्यार्थ्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

शारिक शेख असे यातील आरोपीचे नाव आहे. आरोपी आणि फिर्यादी इरफान मोहम्मद हुसेन हे माहीम येथे राहत असून जुईनगर येथील बर्न्स महाविद्यालयात शिकत आहेत. चार तारखेला त्यांचा ईव्हीएस विषयाची परीक्षा होती. या परीक्षेत आरोपी शारिकला काहीही उत्तरे येत नव्हती. त्यामुळे नापास होण्याची भीतीने त्याने इरफानला उत्तरे दाखवण्यास सांगितले. मात्र इरफानने उत्तरे सांगितली नाही. या बाबत उपस्थित पर्यवेक्षक शिक्षिकेनेही शारिकला समजावून सांगितले. मात्र इरफान मित्र असून मदत न केल्याचा राग मनात ठेवून परीक्षा संपल्यावर वर्गात व वर्गाबाहेर पडताना शारिकने इरफानला बेदम मारहाण केली.

दरम्यान झालेल्या मारामारीचा त्रास इरफानला नंतर जाणवू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास सांगितल्यावर इरफानने माहीम पोलीस ठाण्यात शारिकविरोधात गुन्हा नोंदविला. सदर गुन्हा नेरूळ पोलीस ठाण्यात गुरुवारी वर्ग करण्यात आला असून आता नेरूळ पोलीस सदर गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in