अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या जोडप्यासह तिघांना अटक; ५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

घरातील एक महिला व दोन पुरुष पोलिसांशी झटापट करून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी तिघांची धरपकड केली. त्यानंतर...
अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या जोडप्यासह तिघांना अटक; ५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

नवी मुंबई : घरामधून एमडी (मेफेड्रॉन) या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या जोडप्यासह तिघांना कोपरखैरणे पोलिसांनी शनिवारी पहाटे अटक केली आहे. संदीप मुनिराम शर्मा (२३) त्याची पत्नी निर्मला संदीप शर्मा (२३) व संदीपचा भाऊ वरुण मुनीराम शर्मा (२१) अशी या तिघांची नावे असून या तिघांनी विक्रीसाठी आपल्या घरामध्ये आणून ठेवलेला ५४ ग्रॅम वजनाचे ५ लाख ४० हजार रुपये किमतीचे एमडी (मेफेड्रॉन) जप्त करण्यात आले आहे. सदरचे अमली पदार्थ त्यांनी कुठून आणले याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

कोपरखैरणे सेक्टर-१६ एसएस-१ टाइपच्या रूम नं. ११५ मध्ये राहणारा परिवार अमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती कोपरखैरणे पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील व त्यांच्या पथकाने शनिवारी कोपरखैरणे सेक्टर-१६ मधील संशयित घरावर छापा मारला. यावेळी सदरच्या घरातील एक महिला व दोन पुरुष पोलिसांशी झटापट करून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी तिघांची धरपकड केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, एमडी हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी ५४ ग्रॅम वजनाचा ५ लाख ४० हजार रुपये किमतीचा एमडी हा अमली पदार्थ जप्त केला. या तिघांविरोधात एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली.

मुंबईतील डोंगरी भागातून त्यांनी अमली पदार्थ विक्रीसाठी आणल्याची माहिती दिली असून त्यानुसार पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in