

नवी मुंबई : शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा असतो. हा क्षण विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरावा, यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने ‘शाळा प्रवेशोत्सवा’ची जय्यत तयारी केली असून महापौर, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच महापालिका आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी विविध शाळांमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत.
महापालिकेच्या ५७ प्राथमिक आणि २३ माध्यमिक अशा एकूण ८० शाळांमध्ये १५ जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात होणार आहे. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि संस्मरणीय ठरावा यासाठी महापालिकेच्या वतीने विशेष ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, फुले आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात येणार आहे.
प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात शाळेविषयी आकर्षण निर्माण करणे, शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण तयार करणे तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रवासात पालकांचा सहभाग वाढविणे हा मुख्य उद्देश आहे.
या निमित्ताने महापालिकेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचारी विविध शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा क्षण विशेष ठरावा, यासाठी स्वागत समारंभांचे आयोजन करण्यात आले असून शाळा परिसर आकर्षक पद्धतीने सजविण्यात येत आहे. काही शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
शिक्षणाविषयी गोडी निर्माण होईल
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आणि शिक्षणाविषयी गोडी निर्माण होईल, त्यांचा शाळेतील पहिला दिवस आनंददायी ठरेल आणि शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीही हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास शिक्षण विभागाच्या उपायुक्त संघरत्ना खिल्लारे आणि शिक्षणाधिकारी अशोक कडुस यांनी व्यक्त केला.