नवी मुंबई ते मुंबई विमानतळ एक्सप्रेस मेट्रोने जोडणार

एमएमआरडीए, सिडको आणि मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन या सरकारी संस्थांनी २०१७ साली याबाबतची गोल्ड लाईन योजना विचाराधीन घेतली हेाती.
नवी मुंबई ते मुंबई विमानतळ एक्सप्रेस मेट्रोने जोडणार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचे काम जोरात सुरू असतानाच हा विमानतळ सहार येथील मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला एक्सप्रेस मेट्रोने जोडण्यासाठी विविध सरकारी संस्था नेटाने काम करू लागल्या आहेत. दोन्ही विमानतळांमधील अंतर ३० किलोमीटर इतके आहे. एक्सप्रेस मेट्रोवर मेट्रो रेल ताशी ८० ते ९० किमी वेगाने धावेल, अशी योजना आहे. त्यामुळे दोन्ही विमानतळांमधील अंतर अवघ्या अर्ध्या तासावर येईल. याशिवाय या मार्गावर मोजकीच स्टेशन्स असणार आहेत. यासाठी सल्लागार कंपनी नेमण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या मेट्रोमुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील सर्व उपनगरे दोन्ही विमानतळांशी थेट जोडली जाणार आहेत.

एमएमआरडीए, सिडको आणि मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन या सरकारी संस्थांनी २०१७ साली याबाबतची गोल्ड लाईन योजना विचाराधीन घेतली हेाती. ऑक्टोबर २०२२ मध्ये एमएमआडीएने सिडकोला नवी मुंबई मेट्रो लाईन १-ए वरील सागर संगम ते मानखुर्द दरम्यान मुंबइ मेट्रो लाईन ८ साठी तपशीलवार अहवाल (डीपीआर) तयार करण्यास सांगितले हेाते. हा एकूण १४.४० किमीचा मेट्रो मार्ग होणार आहे. नवी मुंबईतील विमानतळासाठी वेगवान सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याचे महत्त्व जाणून सिडकोने अर्बन मास ट्रांझिट कंपनीची (यूएमटीसी) डीपीआर तयार करण्यासाठी सल्लागार कंपनी म्हणून नेमणूक केली होती. नवी मुंबई मेट्रो सीबीडी बेलापूर ते नवी मुंबई विमानतळापर्यंत लाईन १ए म्हणून तसेच एमएमआडीएची मेट्रोलाईन ८ मानखुर्द ते नवी मुंबई विमानतळापर्यंत लाईन ८ए म्हणून वाढवणे यासाठी तपशीलवार अहवाल तयार करण्याची जबाबदारी यूएमटीसीकडे देण्यात आली आहे. या दोन मेट्रोलाईनमुळे दहिसर, अंधेरी आणि कल्याण ते नवी मुंबई दरम्यान क्षेत्रीय दळणवळण सेापे होणार आहे. कारण सध्या मेट्रो मार्ग उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्यादरम्यान लाईन २ बी आणि मेट्रो लाईन ८ मुळे ते शक्य होणार आहे. तसेच एमएमआरडीएम कल्याण-तळोजा मेट्रो लाईन १२ देखील उभारणार आहे. हा संपूर्ण अहवाल तयार करण्यासाठी १.८६ कोटी रुपये खर्च होणार आहे. पुढील पाच महिन्यांत हा तपशीलवार अहवाल तयार होण्याची अपेक्षा असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सिडकोचा २०२३-२४ अर्थसंकल्प सादर करताना दिली. लवकरच हा गोल्ड लाईन प्रकल्प पुढे नेण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार कंपनीची नेमणूक देखील करण्यात येणार आहे. राज्य सरकार देखील गांभीऱ्याने या महत्त्वपूर्ण प्रकल्पावर विचार करीत आहे.

या मार्गावर ताशी ८० ते ९० किमी वेगाने मेट्रो धावणार

मुंबई आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळांमध्ये ३० किमी अंतर आहे. या मार्गावर दर २० मिनिटांनी गाडीची सोय करण्यात येणार आहे. तसेच वेगवान वाहतुकीसाठी नेमकीच म्हणजे ७ स्थानके ठेवण्यात येणार आहेत. मेट्रो गाडी ताशी ८० ते ९० किमी वेगाने चालवण्याचे विचाराधीन आहे. सध्या ३० ते ३५ किमी वेगानेच मेट्रो धावत आहेत. यामुळे दोन्ही विमानतळांतील अंतर कापण्यास सध्या लागणारा दोन तासांचा अवधी अर्ध्या तासापर्यंत येईल. त्यासाठी वाशी खाडीवर पूल बांधावा लागणार असून, ते महत्त्वाचे काम आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in