नवी मुंबई : ‘ट्रान्स हार्बर’ साडेचार तास ठप्प; प्रवाशांचे प्रचंड हाल

सकाळच्या वेळेस ४ तासाहून अधिक काळ या मार्गावरील लोकल सेवा ठप्प राहिल्याने या मार्गावरुन नियमित प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे व प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
नवी मुंबई : ‘ट्रान्स हार्बर’ साडेचार तास ठप्प; प्रवाशांचे प्रचंड हाल
Published on

नवी मुंबई : ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरुन उन्नत मार्गे जाणाऱ्या ऐरोली-काटई नाका रस्ता प्रकल्पांतर्गत गुरुवारी मध्यरात्री बसविण्यात आलेला गर्डर तिरका झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने पुन्हा एकदा ब्लॉक घेऊन शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा साडेचार तास बंद करण्यात आली. सकाळी ११.३० वाजता गर्डर बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील लोकल सेवा पुर्ववत सुरू करण्यात आली.

दरम्यान, सकाळच्या वेळेस ४ तासाहून अधिक काळ या मार्गावरील लोकल सेवा ठप्प राहिल्याने या मार्गावरुन नियमित प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे व प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. त्यामुळे ठाणे ते वाशी आणि ठाणे ते पनवेलपर्यंतच्या सर्वच स्थानकावर मोठ्या प्रमाणावर प्रवासी अडकून पडले. अखेर ठाणे-बेलापूर मार्गावरुन मिळेल त्या वाहनाने प्रवास करण्याचा प्रयत्न प्रवाशांनी केला खरा, परंतु ठाणे-बेलापूर मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने प्रवासी अनेक तास खोळंबले. या मार्गावर ४ तास वाहतूक कोंडी झाली होती.

गर्डर तिरका बसवल्याने रेल्वे वाहतूक थांबवली

सध्या ऐरोली-काटई नाका रस्ता प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ऐरोली रेल्वे स्थानकाजवळ या मार्गावरील गर्डर बसविण्याचे काम सध्या सुरु आहे. या कामासाठी ट्रान्स हार्बर मार्गावर मध्यरात्री १ ते पहाटे ४ या वेळेत ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र, बसवलेला गर्डर तिरका झाल्याचे लक्षात येताच सुरक्षेच्या दृष्टीने सकाळी ७.१० वाजल्यापासून ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली. त्यामुळे ठाणे ते वाशी व पनवेल दरम्यानच्या सर्व रेल्वे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली.

त्यातच रिक्षाचालक भाडे घेण्यास टाळाटाळ करु लागल्याने प्रवाशांचा संताप अनावर होत होता. काहींनी ओला, उबर, रॅपिडोचा मार्ग निवडला. या सर्व गोंधळामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरुन नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

logo
marathi.freepressjournal.in