

नवी मुंबई : दारूच्या नशेत मित्रांमध्ये झालेल्या क्षुल्लक वादातून तिघांनी मिळून आपल्या ४३ वर्षीय मित्राची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री तुर्भे नाका परिसरात घडली. या घटनेनंतर तिन्ही आरोपी फरार झाले असून, तुर्भे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव पंडित उर्फ आनंद कोरी (४३) असे आहे. त्याची हत्या करून फरार झालेल्या सहकाऱ्यांची नावे आर्यन, राजकुमार आणि विकी अशी आहेत. घटनेच्या दिवशी म्हणजे सोमवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास पंडित आपल्या तिन्ही मित्रांसह तुर्भे नाका येथील ठाणे-बेलापूर मार्गावरील ओव्हरब्रिजखाली बसून दारू पीत होता. दारूच्या नशेत असताना पंडितने इतर तिघांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावरून चौघांमध्ये वाद झाला आणि तो क्षणातच विकोपाला गेला. रागाच्या भरात आर्यन, राजकुमार आणि विकी या तिघांनी मिळून फायबर पाईप आणि बियरच्या बाटलीने पंडितवर जीवघेणा हल्ला चढवला. त्याच्या चेहऱ्यावर आणि कानामागे गंभीर मारहाण करण्यात आली. या अमानुष मारहाणीमुळे पंडित उर्फ आनंद कोरी रक्तबंबाळ अवस्थेत जागेवरच कोसळला. पंडित पडल्याचे पाहताच तिन्ही मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून त्वरित पळ काढला. घटनेची माहिती मिळताच तुर्भे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या पंडितला जवळच्या रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.