

नवी मुंबई : प्रेमप्रकरणातून आणि ब्रेकअपच्या संतापातून कोपरखैरणेतील एका तरुणाने प्रेयसीच्या घरात घुसून प्रेयसीवर व तिच्या बहिणींवर पिस्तुलातून गोळीबार केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री घडली.
या गोळीबारात प्रेयसीच्या पाठीत गोळी लागली आहे, तर तिच्या बहिणीच्या कानाला गोळी घासून गेली आहे. दोघींवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर कोपरखैरणे पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या काही तासांतच गोळीबार करून फरार झालेल्या आरोपीला जेरबंद केले आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अर्जुन सुभाष चव्हाण (२१) असे असून तो कोपरखैरणे सेक्टर-२ मध्ये राहतो. तर जखमी झालेल्या दोघी बहिणी कोपरखैरणे सेक्टर-१ मध्ये राहतात. आरोपी अर्जुन चव्हाण आणि जखमी तरुणी यांच्यात मागील काही काळापासून प्रेमसंबंध होते. मात्र काही कारणामुळे गत सहा महिन्यांपासून त्यांचे ब्रेकअप झाले होते. त्यानंतर आरोपीने गत सप्टेंबरमध्ये या तरुणीला याच गोष्टीवरून मारहाण केली होती.
त्यामुळे तरुणीच्या कुटुंबीयांनी आरोपीला समज दिली होती. त्यावेळी आरोपीने तरुणीला पुन्हा त्रास देणार नसल्याचे कबुल केले होते. मात्र, गुरुवारी आरोपी अर्जुन चव्हाण याचा वाढदिवस असल्याने त्याने तरुणीवर पुन्हा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने त्याला स्पष्ट नकार दिला. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपी अर्जुन चव्हाण हा गुरुवारी रात्री तरुणीच्या घरात घुसला. यावेळी घरात तरुणी व तिची मोठी बहिण या दोघीच घरात होत्या. यावेळी आरोपी अर्जुनने आपल्याकडील पिस्तूलने थेट तरुणीवर गोळी झाडली.