Navi Mumbai : एपीएमसी मार्केटमध्ये सामूहिक चोपडी पूजन; २८ वर्षांची परंपरा कायम; व्यापारवृद्धी आणि समृद्धीसाठी प्रार्थना

दीपावली आणि नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त नवी मुंबईतील वाशी येथील एपीएमसी घाऊक भाजीपाला मार्केटच्या ई-विंगमध्ये सामूहिक चोपडी पूजन सोहळा उत्साहात पार पडला. व्यापारी, अडते, माथाडी कामगार आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत कुलदैवताचे पूजन केले.
Navi Mumbai : एपीएमसी मार्केटमध्ये सामूहिक चोपडी पूजन; २८ वर्षांची परंपरा कायम; व्यापारवृद्धी आणि समृद्धीसाठी प्रार्थना
छायाचित्र : फारुख सय्यद
Published on: 

नवी मुंबई : दीपावली आणि नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त नवी मुंबईतील वाशी येथील एपीएमसी घाऊक भाजीपाला मार्केटच्या ई-विंगमध्ये सामूहिक चोपडी पूजन सोहळा उत्साहात पार पडला. व्यापारी, अडते, माथाडी कामगार आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत कुलदैवताचे पूजन केले. आगामी वर्षात व्यापारवृद्धी, आर्थिक समृद्धी आणि व्यवसायात भरभराट व्हावी, यासाठी यावेळी प्रार्थना करण्यात आली.

एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये सामूहिक चोपडी पूजनाची परंपरा गेल्या २८ वर्षांपासून जपली जात आहे. १९९६ मध्ये मुंबईतील घाऊक भाजीपाला मार्केट वाशी येथे स्थलांतरित झाल्यानंतर या परंपरेला सुरुवात झाली. तेव्हापासून दरवर्षी व्यापारी बांधव एकत्र येऊन नवीन आर्थिक वर्षाचे स्वागत करतात. यंदाही ई-विंगमध्ये पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले. जुन्या हिशोबाच्या वह्यांचे पूजन करून नवीन वर्षाच्या आर्थिक व्यवहारांना सुरुवात करण्यात आली.

छायाचित्र : फारुख सय्यद

या सोहळ्याला आमदार मंदा म्हात्रे, भाजपचे जिल्हा महामंत्री निलेश म्हात्रे, एपीएमसीचे माजी संचालक शंकर पिंगळे यांच्यासह व्यापारी, कमिशन एजंट (अडते), माथाडी कामगार, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत धार्मिक विधींमध्ये सहभाग घेतला. यावेळी मान्यवरांनी एपीएमसी भाजीपाला मार्केटच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरव केला.

हे मार्केट मुंबईसह संपूर्ण राज्याच्या भाजीपाला पुरवठा व्यवस्थेतील महत्त्वाचा दुवा असून, शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक यांना जोडण्याचे काम करते. व्यापारी बांधवांनी अनेक वर्षांपासून सामूहिक पूजनाची परंपरा जपत परस्परांमधील एकोपा आणि विश्वासाचे नाते टिकवून ठेवल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

छायाचित्र : फारुख सय्यद

या पूजनाच्या माध्यमातून बळीराजाला चांगले पीक-पाणी मिळावे, शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा, ग्राहकांना रास्त दरात ताजा भाजीपाला उपलब्ध व्हावा आणि व्यापारी बांधवांच्या व्यवसायात भरभराट व्हावी, अशी प्रार्थना करण्यात आली. ही माहिती एपीएमसीचे माजी संचालक शंकर पिंगळे यांनी दिली.

धार्मिक श्रद्धा, व्यापारी एकजूट आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम असलेल्या या सामूहिक चोपडी पूजनामुळे एपीएमसी मार्केटमधील २८ वर्षांची परंपरा यंदाही उत्साहात पुढे सुरू राहिली.