

नवी मुंबई : अजमेर येथे झालेल्या वादाचा राग मनात धरुन ११ तरुणांच्या टोळक्याने वाशीतील कोपरी गावात राहणाऱ्या तरुणावर धारदार शस्त्रांनी सपासप वार करुन त्याची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री कोपरी गावात घडली. या प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी ११ जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन ४ संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आता इतर आरोपींचा शोध सुरु केला आहे.
या घटनेतील मृत तरुणाचे नाव अमित यादव असून तो वाशीतील कोपरी गावात राहण्यास होता. अमित यादव हा गत २६ डिसेंबर रोजी आपल्या मित्रांसोबत अजमेर येथे गेला होता. तेथे एका इमारतीच्या टेरेसवर वास्तव्यास असताना खैरणे बोनकोडे येथे राहणाऱ्या सोहेल शेख व त्याच्या साथीदारांसोबत अमित व त्याच्या मित्रांचा किरकोळ वाद झाला होता. त्यावेळी सोहेल शेख व त्याच्या साथिदारांनी नवी मुंबईत आल्यानंतर बघून घेण्याची धमकी दिली होती. अजमेर येथून हे सर्व मित्र नवी मुंबईत आल्यानंतर मंगळवारी अमित यादव आपल्या मित्रांसोबत बोनकोडे येथील अय्यप्पा मंदिर परिसरात बसलेला असताना अजय निर्मल, सोहेल शेख व प्रकाश तेथे गेले होते. त्यावेळी अमित यादव याने अजमेर येथे झालेल्या वादाचा जाब त्यांना विचारला असता, ते तिघे त्याच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेले. यावेळी अमित यादव याने सोहेल शेख याच्या कानाखाली चापट मारली, त्यानंतर तिघांनी परत येतो, अशी धमकी देऊन तेथून निघून गेले. त्यानंतर रात्री सुमारे ११.३० वाजता अमित यादव हा त्याच्या मित्रांसोबत कोपरीगाव साईबाबा मंदिराजवळ उभा असताना, त्याठिकाणी पाच मोटारसायकलींवरुन आलेल्या टोळक्याने अमित यादव याच्यावर हल्ला चढवला. यावेळी वसिम राईन, अजय निर्मल व सोहेल शेख यांनी त्यांच्याजवळ असलेल्या धारदार शस्त्राने अमितवर सपासप वार केले, तर इतरांनी त्याला घेराव घालून बेदम मारहाण केली. त्यानंतर सर्व मारेकरी त्याठिकाणावरुन पळून गेले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या अमितला त्याच्या मित्रांनी रिक्षाने वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर एपीएमसी पोलिसांनी ११ आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.