

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वाहन चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असून, १३ मे रोजी एकाच दिवशी वाहन चोरीचे तब्बल सात गुन्हे दाखल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पनवेल येथील सागर झा यांची ८० हजार रुपयांची दुचाकी राहत्या घराच्या सोसायटी पार्किंगमधून चोरीला गेली, तर खारघर येथील स्वप्नील कलसमन यांची साडेतीन लाख रुपये किमतीची मारुती इको गाडी चोरीला गेली. याशिवाय सुरेश राजपाल यांची ८० हजार रुपयांची दुचाकी पापडीचा पाडा बस थांबा येथून चोरीला गेली. तसेच नेरूळ येथील रशीद सय्यद यांची ८० हजार रुपये किमतीची ज्युपिटर स्कूटर रुपारेल सर्कल येथून चोरीला गेली.
मुंब्रा येथील फर्डीन मेमन यांची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी उरण येथील पिरवाडी दर्गा मार्ग येथून चोरीला गेली. तर कोपरखैरणे येथील अमोल दाभाडे यांची ५० हजार रुपयांची रिक्षा स्वामी समर्थ मठ मार्ग येथून चोरीला गेली. तसेच वाशी येथील अंकित गुप्ता यांची ८० हजार रुपयांची दुचाकी सेक्टर १४ मधून चोरीला गेल्याची नोंद झाली आहे.
वाहनचोरीच्या सत्रामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तर आहेच पण शिवाय संतापही व्यक्त होत आहे. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.