नवी मुंबई : नवी मुंबईच्या हक्काचे बारवी धरणातून मिळणारे ४० एमएलडी पाणी न मिळाल्यानेच शहरामध्ये पाणीटंचाई निर्माण झाली. पाणी चोरांमुळे नवी मुंबई तहानलेली राहिली आहे, या शब्दांत वनमंत्री गणेश नाईक यांनी सडकून टीका केली आहे.
नवी मुंबई शहरातील प्रभागांमधील विविध प्रलंबित नागरी समस्या आणि अडचणींवर मार्ग काढण्यासाठी आमदार नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत सिडको प्रदर्शनी केंद्रातील सभागृहामध्ये रविवारी महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी यांची बैठक पार पडली.
या बैठकीस माजी खासदार संजीव नाईक, महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे, माजी महापौर सागर नाईक, जयवंत सुतार, सुधाकर सोनवणे, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, माजी अध्यक्ष रामचंद्र घरत, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, यांच्यासह विविध प्रभागातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि महापालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी आपापल्या प्रभागातील प्रलंबित नागरी कामांची माहिती दिली. रस्ते, पदपथ, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रे, भुयारी मार्ग, समाज मंदिर, नागरी आरोग्य केंद्र, जलवाहिन्या, मलनिसारण वाहिन्या इत्यादी नागरिकांच्या हिताच्या कामांबाबत आणि त्यांच्या सद्यस्थितीबाबत माहिती देत, या कामांना गती देण्याची मागणी केली.
या अनुषंगाने आमदार नाईक यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना ही कामे पूर्णत्वास नेण्याचे निर्देश दिले. पुन्हा एक महिन्यानंतर अशाच प्रकारची बैठक होणार असून त्यामध्ये प्रलंबित नागरी कामांची झालेली प्रगती याचा आढावा घेण्यात येणार आहे.
पाणी चोरूनही काहींची शिरजोरी
बैठकीमध्ये बहुतांश लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर आमदार नाईक म्हणाले की, बारवी धरणातून नवी मुंबईला मिळणारे ४० एमएलडी पाणी अन्यत्र वळवण्यात आले. पाणी चोरल्यानेच नवी मुंबईतील जनता तहानलेली राहिली आहे. त्यामुळे एकीकडे नवी मुंबईचे पाणी चोरायचे आणि दुसरीकडे वरून शिरजोरी करत 'नवी मुंबईत पाणी नाही' असे आरोप करायचे, अशी भूमिका काही घटकांची आहे.
नवी मुंबईला पाण्याचा बॅकलॉग मिळाला पाहिजे
वास्तविक, नवी मुंबईमध्ये लोकप्रतिनिधी सभागृह नसल्याने नगरसेवकांना दोष देताच येत नाही. पाणीटंचाई हे पालिका प्रशासनाचे अपयश आहे. पालिका प्रशासन नगरविकास खात्याच्या अखत्यारीत येते. मागील ५ वर्षे ८ महिने बारवी धरणातून न मिळालेला नवी मुंबईचा पाण्याचा बॅकलॉग मिळाला पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि महापालिका प्रशासनाकडे केल्याची माहिती आमदार नाईक यांनी दिली. रायगडमध्ये प्रस्तावित पोशीर धरणामध्ये नवी मुंबईसाठी ५०० एमएलडी पाणीसाठा आरक्षित केल्याचेही ते म्हणाले.