नवी मुंबई : यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच उष्णतेची तीव्रता वाढू लागल्याने त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होऊ लागला आहे. मार्चच्या पहिल्या दोन आठवड्यांत मे महिन्यासारखी कडक उन्हाची परिस्थिती निर्माण झाल्याने पाण्याचा वापरही वाढला आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या मोरबे धरणातील जलसाठा सध्या सुमारे ५५.३५ टक्क्यांवर आला असून, नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
स्वतःच्या मालकीचे धरण असणारी मुंबईनंतर नवी मुंबई ही पहिलीच महानगरपालिका आहे. मोरबे धरणातील सध्याचा साठा २१ ऑगस्टपर्यंत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तो पुरेसा असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. मात्र, वाढती उष्णता आणि वाढता पाणीउपसा यामुळे साठ्यात हळूहळू घट होत असल्याचे दिसून येत आहे.
मोरबे धरणातील पाणीस्थिती (१७ मार्च २०२६)
वर्ष पाणीसाठा (%)
२०२३-२४ ५२.७३%
२०२४-२५ ५८.३१%
२०२५-२६ ५५.३५%