

नवी मुंबई : महापालिकेत आगामी निवडणुकीनंतर महिलांचे वर्चस्व प्रस्थापित होणार आहे. ५० टक्के आरक्षणामुळे एकूण १११ नगरसेवकांपैकी तब्बल ५६ महिला नगरसेविका असणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी ‘नवी मुंबईत केवळ महिलाराज नव्हे, तर घराणेशाहीलाही पूर्णविराम लागणार’ असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. मनपा निवडणुकीसाठीच्या आरक्षण सोडतीनंतर महिलांची ताकद स्पष्ट झाली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार म्हात्रे म्हणाल्या, मागील ३० वर्षांत पुरुषांची मक्तेदारी मी मोठ्या प्रमाणात मोडीत काढली आहे. आता मला ५६ नगरसेविकांचे बळ मिळणार आहे. त्यामुळे नवी मुंबईत पुरुषांची संपूर्ण मक्तेदारी संपुष्टात येणार आहे. महापौर हा कोणत्याही घराणेशाहीतून नव्हे, तर सर्वसामान्य घरातूनच असणार. मी स्वतः मनपातील पहिली महिला नगरसेविका आहे. महिलांना संधी मिळाल्यास प्रशासन भ्रष्टाचारमुक्त होईल. माझ्या कुटुंबातील कोणीही महापौर पदासाठी उमेदवार असणार नाही.
अप्रत्यक्ष इशारा
म्हात्रे यांच्या या वक्तव्यातील “पुरुषांची मक्तेदारी संपवणार” या विधानामुळे नवी मुंबईच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या गणेश नाईक यांना उद्देशूनच हा 'अप्रत्यक्ष इशारा' असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.