
नवी मुंबई : रबाळे येथील भीमनगरमध्ये राहणाऱ्या आफक मुश्ताक खान (२४) या तरुणाने मंगळवारी दुपारी ठाणे-बेलापूर मार्गालगत असलेल्या रबाळे तलावात उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर रबाळे एमआयडीसी पोलिसांनी महापालिकेच्या ऐरोली अग्निशमन दलाच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली होती. अखेर बुधवारी सकाळच्या सुमारास आफक खानचा मृतदेह सापडला.
प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी दुपारी आफक खानने रबाळे तलावात उडी मारल्याची माहिती मिळताच, रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने शोधकार्य सुरू केले. परंतु, पहिल्या दिवशी मृतदेह सापडला नव्हता. बुधवारी सकाळी, ऐरोली अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी भोईर, सहाय्यक केंद्र अधिकारी सचिन भोसले आणि संदेश चेन्ने यांच्या पथकाने पुन्हा तलावात शोधमोहीम सुरू केली. या प्रयत्नांत आफक खानचा मृतदेह सापडला.
रबाळे एमआयडीसी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल जुईकर यांनी दिली. या प्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून, तपास सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.