वाढदिवशीच गमावला जीव; बांधकामासाठी खोदलेल्या खड्डयात बुडून तरुणाचा मृत्यू

मृत राज सनगरे हा जुईनगर सेक्टर-२३ मधील परशुराम सोसायटीत राहण्यास होता. मंगळवारी त्याचा वाढदिवस असल्याने तो दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रCanva

नवी मुंबई : जुईनगर सेक्टर-२३ मध्ये राहणाऱ्या राज संजय सनगरे (२८) या तरुणाचा त्याच्या वाढदिवशीच इमारतीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्डयातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मित्रांसोबत तो येथील पाण्यात पोहोण्यासाठी गेला असताना मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली.

या घटनेतील मृत राज सनगरे हा जुईनगर सेक्टर-२३ मधील परशुराम सोसायटीत राहण्यास होता. मंगळवारी त्याचा वाढदिवस असल्याने तो दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास जुईनगर सेक्टर-२४ मधील मंगलप्रभु हॉस्पीटलजवळ इमारतीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्डयातील साचलेल्या पाण्यात मित्रांसह पोहण्यासाठी गेला होता. यावेळी राज सनगरे याने मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर तो पाण्यात पोहण्यासाठी उतरला; मात्र पोहता न आल्याने तो येथील पाण्यात बुडाला. यावेळी त्याच्या मित्रांनी याबाबतची माहिती राज याच्या कुटुंबीयांना दिल्यानंतर त्यांनी नेरुळ पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यातून राज सनगरे याचा मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठवून दिला. नेरुळ पोलिसांनी या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. राज सनगरे याचा त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in