नवी मुंबईची स्वच्छतेकडून समृद्धीकडे वाटचाल

स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत महापालिकेसोबत विविध सेवाभावी, सामाजिक संस्था आणि नागरिकांचा उदंड सहभाग
नवी मुंबईची स्वच्छतेकडून समृद्धीकडे वाटचाल

स्वच्छतेमध्ये देशात तृतीय व राज्यात प्रथम क्रमांकाचे उल्लेखनीय शहर म्हणून नवी मुंबई शहराचे नाव घेतले जाते. याचदृष्टीने पावले टाकत स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत स्वच्छतेची मोठी चळवळ उभी राहिली आहे. महापालिकेकडून स्वच्छतेबाबत मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. संपूर्ण शहरात मागील काही महिन्यांपासून स्वच्छतेचा एल्गार पुकारण्यात आला असून शहरातील रस्ते, खाडी परिसर, उद्याने, रेल्वे स्थानक परिसर, मैदाने, रुग्णालय-शाळा परिसर अशा सर्व ठिकाणी अगदी कानाकोपऱ्यात असलेला कचरा जमा केला जात आहे. शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक संस्था, एनएसएस सारखे गट यासाठी पुढे आले असून विविध उपक्रम-स्पर्धेद्वारे प्लास्टिकबंदी आणि स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात येत आहे.

शहरातील स्वच्छतेला प्राधान्य देताना नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर नागरिकांना सहभागी करत स्वच्छतेचा एकत्रित लढा लढत आहेत. तसेच सध्या बऱ्याच स्वयंसेवी संस्था स्वच्छताविषयक विविध बाबींमध्ये महानगरपालिकेसोबत सक्रीय आहेत. रिसायकलींग मार्ट, आत्मनिर्भर सोसायटी, लोकसहभागातून सार्वजनिक जागांचे सुशोभिकरण, रस्ते दत्तक योजना, उद्यानांच्या कडेला पेट कॉर्नर निर्मिती, सर्व वॉर्डमध्ये स्वच्छता कॉर्नर स्वरूपातील सेल्फी पॉइंट्स निर्मिती, प्लॉग रन, झिरो वेस्ट वॉर्ड, सुंदर माझा दवाखाना असे नानाविध नाविन्यपूर्ण उपक्रम महानगरपालिकेने हाती घेतले आहेत. पालिकेतर्फे स्वच्छता कार्य केले जात असताना अनेक स्वयंसेवी संस्थांची त्याला जोड मिळत आहे. यामुळे मागील काही महिन्यांपासून शहरात व्यापक स्वच्छता चळवळ उभी राहिली आहे.

शहरातील सोसायट्यांनी देखील यासाठी पुढाकार घेतला असून सोसायटीच्या सदस्यांकडून घरोघरी कचरा वर्गीकरण केले जाते त्याच्या एक पाऊल पुढे जात सोसायटीच्या आवारातच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करत घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रकल्प राबवला जात आहे. बहुतांश सोसायटीत ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्पाला सुरुवात झाली आहे. यावेळी सोसायटीच्या वापराएवढे खत सोसायटीसाठी ठेऊन अधिकचे खत नवी मुंबई महानगरपालिका उद्याने व हरीतपट्टे यामधील वापरासाठी घेऊन जात आहे.

दरम्यान, शहरातील उद्यानांत अथवा मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला-पुरुषांना आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याबाबत महापालिका अधिकाऱ्यांकडून जनजागृती करण्यात येत आहे. तसेच नागरिकांना स्वच्छतेची व प्लास्टिक बंदीबाबतची सामूहिक शपथ देण्यात येत आहे. याशिवाय प्लास्टिक वापरणे टाळा हे सांगताना नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात येत आहे.

खाडीकिनाऱ्यांवर सर्वाधिक लक्ष

सीवूड्स सेक्टर-५० परिसर, चाणक्य परिसर, नेरुळ येथील सारसोळे, वाशी येथील सागर विहार, मिनी सी शोअर, बेलापूर येथील सरोवर विहार ऐरोली येथील खाडी परिसरात याठिकाणी प्लास्टिक बंदी ही मोहीम महापालिकेतर्फे राबवण्यात येत आहे. यामध्ये स्थानिक नागरिक, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच अनेक सामाजिक संस्था मोठ्या संख्येने सहभागी होत खाडीकिनारी असलेले प्लास्टिक, काचेच्या बाटल्या, इतर कचरा जमा करत आहेत.

फ्लेक्स होर्डींगबाबत विशेष सूचना

महानगरपालिकेने शहर सुशोभिकरणासाठी शहरातील मुख्य चौकात उभारलेल्या आकर्षक शिल्पाकृतींच्या सभोवताली असलेल्या रेलींगवर फ्लेक्स होर्डींग लावल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सदर होर्डींग तातडीने काढून टाकण्याचे निर्देशित करतानाच नागरिकांनीही याबाबत सतर्क राहून शहर अस्वच्छतेला कारणीभूत ठरणारे होर्डींग महानगरपालिकेने निश्चित करून दिलेल्या जागीच रितसर विभाग कार्यालयाची परवानगी घेऊन लावण्याचे आवाहन आयुक्तांमार्फत करण्यात आले. शहराच्या स्वच्छ व सुंदर प्रतिमेला हानी पोहचणार नाही याची दखल नागरिकांनी घ्यावी व संबंधित महानगरपालिका विभाग कार्यालयानेही याबाबतच्या प्रतिबंधात्मक मोहिमा नियमितपणे व तीव्रतेने राबवाव्यात, असेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

संदेशात्मक भित्तीचित्रे सुखावणारी

लक्षवेधी सुशोभिकरण असलेल्या नवी मुंबई विषयी इतर शहरातील नागरिकांना कायम कुतूहल वाटते. शहरात प्रवेश केल्यानंतर डोळ्यांना सुखावणाऱ्या रंगसंगतीने सजलेल्या चित्राकृती, विविधांगी शिल्पे यामुळे मनाला आल्हाददायक, सुखावह वाटते. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ला सामोरे जात असताना शहर स्वच्छतेप्रमाणेच सुशोभिकरणाच्या वेगळ्या संकल्पना राबविण्यावर पालिकेकडून भर देण्यात येत आहे. यामध्ये यंदा काही चित्रभिंती विविध संतांच्या समाजजागृती करणाऱ्या ओव्या, अभंग व वचनांनी सजणार असून त्यासोबतच नामवंत साहित्यिकांच्या जीवनाला प्रेरणा देणाऱ्या काव्यपंक्तीही काही ठिकाणी अनुरुप चित्रांसह सुलेखनांकित करण्यात येत आहेत. ६५० हून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थी आणि चित्रकारांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात सुशोभिकरण कामाला सुरुवात झालेली आहे.

यंदाचे विशेष बदल

- नवीन शिल्पाकृती न बसविता मागील वर्षी बसविलेल्या शिल्पाकृतींची आवश्यकतेनुसार डागडुजी.

- अशाचप्रकारे प्रभागांमध्ये ठिकठिकाणी बसविण्यात आलेली कारंजे कार्यान्वित करण्यात येणार.

- तलावांच्या जलाशयांचे कठडे व सभोवतालच्या जागेच्या सुशोभिकरणावर भर.

- एमआयडीसी क्षेत्रातील स्वच्छतेकडे अधिक बारकाईने लक्ष.

- झोपडपट्टी व गांवठाण भागातही सुशोभिकरण.

"नवी मुंबई शहर नियमित स्वच्छ रहावे ही बांधिलकी जपत महानगरपालिका काम करीत असून येथील जागरुक नागरिकांच्या संपूर्ण सक्रीय सहभागाशिवाय हे शक्य नाही. तरी प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने आपल्या घरातील कचरा ओला, सुका व घरगुती घातक अशा ३ प्रकारे वेगळा करावा व महानगरपालिकेकडे वेगवेगळा द्यावा. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या घरातील कचरा उघड्यावर रस्त्यात टाकून शहर अस्वच्छ करू नये."

- राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

स्वच्छतेत महिलांचा सिंहाचा वाटा

नवी मुंबईच्या स्वच्छतेत महिलांच्या सहभागावर विशेष भर दिला जात आहे. नुकतीच महानगरपालिकेने ५ हजारहून अधिक महिला आणि विद्यार्थ्यांची ‘स्वच्छता संग्राम रॅली’ आयोजित करून ‘स्वच्छोत्सव २०२३’ अत्यंत उत्साहात साजरा केला. घरातील दैनंदिन स्वच्छतेसोबत महिला सार्वजनिक स्तरावरील स्वच्छता मोहिमांमध्येही मोठ्या उत्साहाने आणि जबाबदारीने सहभागी होताना दिसत आहेत. स्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर नेरुळ येथील महिलांच्या पिंकेथॉन या संस्थेने स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतला. विशेष म्हणजे या लहानशा उपक्रमात देखील २५ हून अधिक महिलांनी उत्साही सहभाग घेत नेरुळ सेक्टर १९ येथील आरटीओ ट्रॅक भोवतालचा परिसर साफ केला. प्लास्टिकच्या बॉटल्स, फेकून दिलेले प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून पिंकेथॉनच्या महिलांनी एक आदर्श उभा केला.

logo
marathi.freepressjournal.in