

नवी मुंबई : नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात मद्यपींकडून होणारी हुल्लडबाजी, अमली पदार्थांचे सेवन व विक्री, गुटख्याची विक्री तसेच बेघर आणि गर्दुल्ल्यांमुळे प्रवाशांना होणारा त्रास रोखण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी महापालिका आणि सिडकोच्या सहकार्याने मध्यरात्री धडक कारवाई केली. या पार्श्वभूमीवर, नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या परिसरात कायमस्वरूपी सुरक्षा व देखरेख व्यवस्था उभारण्याची गरज महापौर सुजाता पाटील यांनी व्यक्त केली आहे.
नेरूळ रेल्वे स्थानक परिसरात १ सप्टेंबरला रात्री ११.३० ते २ सप्टेंबर रोजी पहाटे १.३० वाजेपर्यंत संयुक्त कारवाई करण्यात आली. नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त अमित काळे, सीबीडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदेश नाईक आणि नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत महापौर सुजाता पाटील यांनी वाढत्या गैरप्रकारांबाबत चिंता व्यक्त केली. नवी मुंबईत रेल्वे प्रशासन, सिडको, पालिका आणि पोलीस प्रशासन अशी चार प्रमुख प्राधिकरणामध्ये प्रभावी समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना
वाशी, नेरूळसह नवी मुंबईतील अनेक रेल्वे स्थानके पूर्वी स्वच्छ आणि सुंदर म्हणून ओळखली जात होती. मात्र आज काही स्थानकांच्या परिसरात मद्यपी, गर्दुल्ले, बेघर आणि अमलीपदार्थांची विक्री करणाऱ्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, असे महापौर सुजाता पाटील यांनी नमूद केले.
प्रतिबंधात्मक व्यवस्था उभारा
रेल्वे स्थानकांवर अधूनमधून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यापेक्षा कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक व्यवस्था उभारणे अधिक प्रभावी ठरेल, असे मत महापौरांनी व्यक्त केले. प्रत्येक प्रमुख रेल्वे स्थानकाबाहेर छोटी पोलीस चौकी उभारून तेथे पोलिसांसह संबंधित चार प्राधिकरणांपैकी प्रत्येकी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याची सूचना त्यांनी केली.
रोजच्या रोज देखरेख केल्याने गैरप्रकारांना आळा
महिन्यातून किंवा पंधरा दिवसांनी मोहीम राबवून कर्मचारी तैनात करण्यापेक्षा रोजच्या रोज देखरेख ठेवली, तर गैरप्रकारांना आळा बसेल. स्टेशन परिसरात कायमस्वरूपी चौकी आणि कर्मचारी असल्यास तेथे गैरप्रकार करणाऱ्यांवर आपोआप धाक निर्माण होईल, असे पाटील म्हणाल्या.