
नंदकुमार ठाकूर/ नवी मुंबई
नवीन वर्ष सुरू होण्यास दोन दिवस शिल्लक आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक सज्ज झाले असले तरी यंदा नववर्षाचे स्वागत करताना शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नवी मुंबई पोलिसही सज्ज झाले आहेत. परिमंडळ दोन अर्थात पनवेल आणि उरण परिसरात असणाऱ्या शेतघरांवर रेव्ह पार्टी आयोजनावर पोलिसांची करडी नजर आहे. अमली पदार्थ सेवन आणि मद्य प्राशन करून गाडी चालवणाऱ्यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून त्या अनुषंगाने सर्व तयारीही केली आहे. त्यामुळे जोशात नववर्ष स्वागत करीत असताना कुठल्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन करू नका, असे आवाहन पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केले आहे.
मुंबईनंतर नवी मुंबई परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पार्ट्यांचे आयोजन केले जाते. पनवेल, उरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात फार्म हाऊसवर नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक पर्यटक दाखल होतात. मात्र या पर्यटकांकडून कोणत्याही नियमांचा उल्लंघन होऊ नये, यासाठी नवी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. मद्य प्राशन करून गाडी चालवू नये. त्यामुळे स्वतः सोबत इतरांनाच जीव धोक्यात घालू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. नवी मुंबई पोलिसांकडून थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यासाठी अडीच हजार पोलीस अधिकारी-कर्मचारी, त्याशिवाय वाहतूक विभागाचे अधिकारी, öकर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. यात ३ पोलीस उपआयुक्त, ६ सहाय्यक पोलीस आयुक्त, ५० पेक्षा अधिक पोलीस निरीक्षक, २०० सहाय्यक पोलीस निरीक्षक-पोलीस उपनिरीक्षक त्याचप्रमाणे १७०० पेक्षा अधिक पोलीस अमलदारांचा समावेश आहे.
दीड हजार कर्मचारी तैनात
नवी मुंबईतून शीव-पनवेल, ठाणे - बेलापूरसह उरण फाटा ते उरण आणि जेएनपीटी हा मोठा मार्ग पनवेल आणि उरण परिसरातील मार्गावर तसेच शहरातील महत्त्वाच्या
चौकात ३१ तारखेपासून ते १ जानेवारी सकाळपर्यंत बंदोबस्त असणार आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सर्व ठिकाणी बंदोबस्तात दोन उपायुक्त ५ सहाय्यक आयुक्त, यांच्यासह २० वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच सुमारे दीड हजार कर्मचारी असणार आहेत. या शिवाय सीसीटीव्ही कंट्रोल रूममध्ये विशेष कायम लक्ष असणार आहे. पोलीस मदतीसाठी ११२ या हेल्पलाईनवर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नागरिकांनी नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात करावे मात्र कोणत्याही चुकीच्या गोष्टींना बळी पडू नये किंवा त्या करू नयेत, अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नियमांचे उल्लंघन होणार नाही, असे कोणत्याही पार्टीचे आयोजन केल्यास संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल होतील.
- मिलिंद भारंबे,
(पोलीस आयुक्त नवी मुंबई)