नवी मुंबई : नामवंत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी एनडी स्टुडिओत गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या पार्थिवावर एनडी स्टुडिओच्या परिसरात शुक्रवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
बुधवारी रात्री जे. जे. रुग्णालयातील चार डॉक्टरांच्या पथकाने देसाईंचे शवविच्छेदन केले. गळफास लावल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी रायगड पोलिसांनी सुरू केली आहे.
देसाई यांचा मृतदेह मुंबईतील शवागृहात ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी त्यांच्यावर एनडी स्टुडिओ परिसरात अंत्यसंस्कार केले जातील. आपल्यावर अंत्यसंस्कार स्टुडिओच्या परिसरात केले जावेत, असे देसाई यांनी एका चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.
स्टुडिओच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, स्टुडिओतील ६ व्या क्रमांकाच्या ग्राऊंडवर हे अंत्यसंस्कार केले जातील.
देसाई यांच्या मृतदेहाशेजारी इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस सापडले आहेत. ते तपासणीसाठी न्यायवैज्ञक शाखेकडे पाठवले आहेत. पोलिसांनी स्टुडिओतील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत.