नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे! कृती समितीच्यावतीने अध्यक्ष दशरथ पाटील यांचा इशारा
ठाणे : दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासंदर्भातला प्रश्न केंद्र शासनाकडे प्रलंबित असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष पसरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत येत्या १५ दिवसांत बैठक आयोजित केली जाईल. राज्य शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत तातडीने दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून नाव जाहीर करावे, तसेच नोटिफिकेशन जारी करावे. अन्यथा असंतोषाचा स्फोट होईल, असा इशारा कृती समितीच्या वतीने अध्यक्ष, ज्येष्ठ समाजवादी नेते दशरथ पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.
दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देणे तसेच इतर प्रश्नांबाबत विचारविनिमय करण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत दशरथ पाटील बोलत होते.
बैठकीला माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, जे. डी. तांडेल, संतोष केणे, गुलाब वझे, नितीन पाटील, डॉ. यशवंत सोरे, शरद म्हात्रे, वासुदेव भोईर, दीपक पाटील, दीपक म्हात्रे, सीमा घरत, संजय घरत, संतोष घरत, धीरज कालेकर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, यासाठी आजवर अनेक आंदोलने केली. त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्या नावाचा ठराव महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून तो केंद्र सरकारकडे पाठविला आहे. परंतु हा ठराव केंद्रात अजूनही प्रलंबित आहे. विमानतळाचे काम आता पूर्णत्वास आले आहे. कदाचित नोव्हेंबरपासून उड्डाणाला सुरुवात होईल. अशावेळी दि. बां.चे नाव या विमानतळाला देणे गरजेचे असल्याचे दशरथ पाटील यांनी सांगितले.
दि. बा. पाटील यांचा स्मृतीदिन दि. २४ जून रोजी आहे. या दिवशी काही भव्य कार्यक्रम आखता येईल का? यावर बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. यासाठी वेगवेगळ्या भागात त्या त्या भागातील कार्यकर्त्यांनी लोकजागृती करत बैठका घ्याव्यात आणि कार्यक्रम यशस्वी करावा, असे सांगण्यात आले.
केंद्राने त्वरित प्रश्न सोडवावा
केंद्र सरकारच्या हवाई वाहतूक मंत्र्यांबरोबर बैठक घेऊन कृती समितीच्या वतीने या प्रश्नाचा पाठपुरावा केला आहे. तरीही आजपर्यंत हा प्रश्न केंद्रात प्रलंबित असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष पसरला आहे. या असंतोषाचा स्फोट होऊ न देता केंद्राने हा प्रश्न त्वरित सोडवावा, असे दशरथ पाटील म्हणाले. विमानतळ परिसरात नोकऱ्यांचा प्रश्न कसा सोडवायचा त्यात प्रकल्पग्रस्तांना व ठाणे, रायगड, पालघर, मुंबई येथील भुमिपूत्रांना प्राधान्य देऊन नोकरभरती करणेसाठीही प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे दशरथ पाटील म्हणाले.