
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ताकर विभागाने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ६३२.५० कोटी रुपयांचे उत्पन्न जमा केले आहे. गेल्या वर्षीपेक्षा १०६.५ कोटींनी अधिक उत्पन्न असून मालमत्ता कर विभागाने वर्षभरात जमा केलेल्या महसूलाचा आत्तापर्यंतचा विक्रम आहे. गेल्या वर्षी नवी मुंबई महापालिकेने ५२६ कोटींचा मालमत्ता कर जमा केला होता. नवी मुंबईमध्ये राबविलेल्या अभय योजनेला नवी मुंबईकरांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.
महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता विभागाच्या प्रमूख अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी आतापर्यंतचा सर्वाधिक मालमत्ताकर वसूल करण्यात यश मिळविले. कर थकबाकीचा प्रश्न सोडविण्यासाठी १५ फेब्रुवारीपासून अभय योजना जाहीर केली होती. यामध्ये १५ मार्चपर्यंत कर भरणाऱ्यांना थकीत कराच्या दंडात्मक रक्कमेवर ७५ टक्के सूट देण्यात आली होती. तसेच, १६ ते ३१ मार्च दरम्यान ५० टक्के सूट देण्यात आली होती. या योजनेचा लाभ १२,०६८ नागरिकांनी घेतला असून यामध्ये सहकार्य करणाऱ्यांचे आयुक्तांनी आभार मानले. तसेच, आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कर वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण केल्याबद्दल अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.