नवी मुंबईत आरोग्य सुविधांचे पालटणार रूप; महापालिकेचे ‘सुंदर माझा दवाखाना’ अभियान

महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी या अभियान अंतर्गत निर्देश दिले होते. त्यानुसार हे अभियान ७ ते १४ एप्रिल या कालावधीत उत्साहाने राबविण्यास सुरुवात झाली
नवी मुंबईत आरोग्य सुविधांचे पालटणार रूप; महापालिकेचे ‘सुंदर माझा दवाखाना’ अभियान

जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून ७ एप्रिलपासून नवी मुंबई महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयांमध्ये ‘सुंदर माझा दवाखाना’ हा अभिनव उपक्रम राबविण्यास सुरवात महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार सुरुवात झालेली आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी या अभियान अंतर्गत महापालिकेच्या आरोग्य सेवेतील स्वरुप बदलून टाका व रुग्णांना प्रसन्न वाटेल, अशी वातावरण निर्मिती करा असे निर्देश दिले होते. त्यानुसार हे अभियान ७ ते १४ एप्रिल या कालावधीत उत्साहाने राबविण्यास सुरुवात झाली असून, यामध्ये शहरातील सामाजिक संस्था, नागरिकांना सहभागी केले जाणार आहे.

‘सर्वांना आरोग्य समता, आरोग्य सुविधा’ या संकल्पनेवर आधारित या वर्षीचा आरोग्य दिन साजरा केला जात असून, महापालिकेच्या २३ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ४ रुग्णालयात हा उपक्रम आठ दिवस राबविला जात आहे. सर्वांना समान आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच अधिकाधिक नागरिकांनी महापालिकेच्या सार्वजनिक रुग्णालय सुविधांचा वापर करावा या अनुषंगाने व्यापक प्रचार आणि प्रसिद्धी करण्यात येणार आहे.

या उपक्रमांतर्गत महापालिकेची सर्व रुग्णालये आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वच्छ व प्रसन्न वातावरण राखण्याकरिता भोवतालचा परिसर, सर्व अंतर्गत विभाग, स्वच्छतागृहे, भांडारगृहे, उद्यान यांची स्वच्छता, आवाराचे व दर्शनी भागातील सुशोभिकरण, रंगरंगोटी आणि आरोग्य संस्थेमार्फत जनतेला देण्यात येणाऱ्या सेवांचे फलक दर्शनी भागात लावणे अशी विविध कामे करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे औषध भांडरगृह, कार्यालयीन विभाग, प्रयोगशाळा विभाग, औषध विभाग अशा विविध विभागांतील साहित्य, रेकॉर्ड, रजिष्टर यांची सुव्यवस्थित रचना करून त्यावर विषयानुरुप चिठ्ठ्या लावल्या जाणार आहेत.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी स्वच्छता दिन

सदर अभियान रुग्णालये व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रभावीपणे राबविण्यात यावे व रुग्णाला सुखदायी वाटेल अशी प्रसन्न वातावरण निर्मिती करावी, असे स्पष्ट करीत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी महिन्याच्या पहिल्या शनिवारी स्वच्छता दिन पाळावा आणि स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट असल्याने स्वच्छतेत सातत्य राखावे, असे निर्देशित केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in