३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या; ‘नमुंमपा’चे नागरिकांना आवाहन

नवी मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील धोकादायक इमारतींचे २०२४-२५ सालासाठी सर्वेक्षण करण्यात आले असून, यामध्ये एकूण ५२७ इमारती धोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ३० वर्षांपेक्षा जुन्या सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे अनिवार्य असल्याचे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेने केले आहे.
३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या; ‘नमुंमपा’चे नागरिकांना आवाहन
Published on

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील धोकादायक इमारतींचे २०२४-२५ सालासाठी सर्वेक्षण करण्यात आले असून, यामध्ये एकूण ५२७ इमारती धोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ३० वर्षांपेक्षा जुन्या सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे अनिवार्य असल्याचे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

ज्या इमारतींना वापरात येऊन ३० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे, अशा सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी महापालिकेने मान्यता दिलेल्या बांधकाम अभियंता किंवा संरचना अभियंत्याकडून करून घ्यावे लागणार आहे. ही कालगणना भोगवटा प्रमाणपत्र (पूर्ण अथवा अंशतः) मिळालेल्या दिवसापासून केली जाणार आहे.

परीक्षण करणाऱ्या अभियंत्याने सुचवलेल्या दुरुस्तीची कामे पूर्ण करून, इमारत सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र संबंधित विभागाकडे सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधित इमारत मालक, संस्था किंवा भोगवटादार यांच्यावर २५,००० रुपये किंवा वार्षिक मालमत्ता करापेक्षा जास्त रकमेचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

महापालिकेने अधिकृत स्ट्रक्चरल इंजिनिअरची यादी संकेतस्थळावर www.nmmc.gov.in उपलब्ध करून दिली आहे. सर्व संबंधितांनी त्यांच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट ३० सप्टेंबर पूर्वी पूर्ण करून अहवाल संबंधित विभागाचे सहाय्यक आयुक्त, विभाग अधिकारी किंवा सहाय्यक संचालक नगररचना यांच्याकडे सादर करावा, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.\

धोकादायक झालेल्या इमारतींचा, घरांचा वापर करणे जिकरीचे आहे. त्यामुळे जीवित आणि वित्तहानी होऊ शकते. म्हणून नागरिकांकडून धोकादायक इमारतींचा, घराचा रहिवास, वापर तत्काळ थांबविण्यात यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. अन्यथा दुर्दैवी अपघात घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांची राहील, याची नोंद घेण्यात यावी, असे सूचित करण्यात येत आहे. - डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

logo
marathi.freepressjournal.in