काँक्रीटीकरणामुळेच ९० टक्के झाडे कोसळली; आता मार्च-एप्रिलमध्ये SOP नुसार वृक्ष छाटणी

जुलै २०२६ मधील अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यांमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यावरील कायमस्वरूपी उपाययोजना निश्चित करण्यासाठी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षतज्ज्ञांची विशेष बैठक महापालिका मुख्यालयात पार पडली.
काँक्रीटीकरणामुळेच ९० टक्के झाडे कोसळली; आता मार्च-एप्रिलमध्ये SOP नुसार वृक्ष छाटणी
काँक्रीटीकरणामुळेच ९० टक्के झाडे कोसळली; आता मार्च-एप्रिलमध्ये SOP नुसार वृक्ष छाटणीप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

नवी मुंबई : जुलै २०२६ मधील अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यांमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यावरील कायमस्वरूपी उपाययोजना निश्चित करण्यासाठी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षतज्ज्ञांची विशेष बैठक महापालिका मुख्यालयात पार पडली. या बैठकीत शहरातील झाडे पडण्यामागील शास्त्रीय कारणांचा सखोल आढावा घेऊन भविष्यातील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

महापालिका आता झाडांच्या छाटणीसाठी स्वतंत्र स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) तयार करणार आहे. त्यानुसार मान्सूनपूर्वी म्हणजे मार्च किंवा एप्रिल महिन्यातच शास्त्रीय पद्धतीने वृक्षछाटणी करण्यात येणार असून ऑक्टोबर महिन्यात छाटणी पूर्णपणे टाळण्यात येईल.

झाडांचा वरचा भाग योग्य आकारात ठेवून त्यांची उंची नियंत्रित केली जाईल, जेणेकरून वाऱ्याचा ताण संतुलित राहील. प्रत्येक झाडाच्या छाटणीपूर्वी आणि छाटणीनंतर छायाचित्रे घेणे बंधनकारक करण्यात येणार आहे. तसेच सध्या झुकलेल्या सर्व झाडांचे छायाचित्रण करून ‘केस-टू-केस’ अभ्यास केला जाईल. नुकत्याच कोसळलेल्या झाडांचे दृश्यमान मूल्यांकन, गेल्या वर्षभरातील छाटणीचा डेटा तपासणी आणि ‘रिस्क असेसमेंट’ करून आवश्यक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.

झाडे कोसळण्यामागील प्रमुख कारणे

रस्ते आणि गृहनिर्माण संस्थांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर झालेल्या काँक्रीटीकरणामुळे झाडांच्या मुळांना वाढण्यासाठी आवश्यक जागा मिळत नाही. तसेच केबल व पाईपलाइन टाकण्यासाठी वारंवार होणाऱ्या खोदकामामुळे मुळे कापली जात असल्याने रस्त्यालगतची सुमारे ९० टक्के झाडे कोसळतात. याउलट गावठाण आणि झोपडपट्टी भागात हे प्रमाण अत्यल्प असल्याचे निदर्शनास आले. इमारतींमुळे पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने झाडे प्रकाशाच्या दिशेने रस्त्याकडे झुकतात आणि त्यांचे नैसर्गिक संतुलन बिघडते. तसेच शास्त्रीय पद्धतीऐवजी केवळ एकाच बाजूने झाडांची छाटणी केल्यास वादळी वाऱ्यांमध्ये त्यांच्यावर असमतोल ताण येऊन ती कोसळण्याची शक्यता वाढते.

फायकस प्रजातीची झाडे लावणे अयोग्य

मुंबई महानगर प्रदेशात अलीकडेच वादळामुळे झालेल्या मोठ्या वृक्षहानीनंतर नवी मुंबई महापालिकेने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या समस्येवर दीर्घकालीन आणि शास्त्रीय उपाययोजना राबविण्याचा निर्धार केला असून, शहरातील वृक्षसंवर्धन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण पावले मानली जात आहेत. तज्ज्ञांनी फायकस प्रजातीची झाडे रस्त्यालगत लावणे अयोग्य असल्याचे नमूद केले. तसेच गुलमोहर आणि सोनमोहर या वृक्षांचे लाकूड ठिसूळ असल्याने त्यांच्या फांद्या वादळात अधिक प्रमाणात तुटतात, असेही निरीक्षण नोंदविण्यात आले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in