नवी मुंबई- वर्ल्ड ट्रेड सेंटरसाठी एनएमएमटीच्या बसचे भाडे दुप्पट; प्रवाशांमध्ये नाराजी

एनएमएमटीकडून नवी मुंबईहून अटल सेतूमार्गे वर्ल्ड ट्रेड सेंटर करिता दोन नवीन बससेवा नुकत्याच सुरू करण्यात आल्या. मात्र या बसेसचे भाडे खासगी बस ऑपरेटर आणि बेस्ट बसच्या तुलनेत दुप्पट असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

टीपीजी कृष्णन/ मुंबई

एनएमएमटीकडून नवी मुंबईहून अटल सेतूमार्गे वर्ल्ड ट्रेड सेंटर करिता दोन नवीन बससेवा नुकत्याच सुरू करण्यात आल्या. मात्र या बसेसचे भाडे खासगी बस ऑपरेटर आणि बेस्ट बसच्या तुलनेत दुप्पट असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. या बसेसचे भाडे कमी केले नाही तर प्रवाशांअभावी ही सेवा लवकरच बंद करावी लागण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईतून वर्ल्ड ट्रेड सेंटरकडे एनएमएमटी बसेसद्वारे फ्री-वे मार्गे प्रवास करणारे प्रवासी वाशी टोल नाका आणि फ्रीवेवर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा नेहमीच सामना करत असत. त्यामुळे त्यांना त्यांच्या कार्यालयात उशिरा पोहोचावे लागत होते. या दररोजच्या समस्येचा सामना टाळण्यासाठी प्रवाशांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमार्गे वर्ल्ड ट्रेड सेंटरकडे जाणाऱ्या एनएमएमटी बस सेवेसाठी नियमित आणि वारंवार बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती. प्रवाशांच्या मागणीचा विचार करून आणि बेस्टद्वारे नवी मुंबई ते कुलाबा/मंत्रालय चालवल्या जाणाऱ्या एसी बस सेवेसह गेल्या महिन्यात एनएमएमटीने प्रवाशांकडून मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमार्गे नवी मुंबई ते वर्ल्ड ट्रेड सेंटर याठिकाणी प्रस्तावित बस सेवेबाबत फीडबॅक घेण्यासाठी एक फॉर्म वितरीत केला. त्यानुसार, एनएमएमटीकडून १२ सप्टेंबर २०२४ रोजी नवी मुंबईहून अटल सेतूमार्गे दोन नवीन बस सेवा सुरू करण्यात आल्या. बस क्रमांक ११६ नेरूळ बस डेपोमधून आणि बस क्रमांक ११७ खारघरमधील सेक्टर ३५ येथून धावू लागली. अटल सेतूमार्गे वर्ल्ड ट्रेड सेंटरला जाण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असलेल्या प्रवाशांना तिकीट दर पाहून धक्का बसला. बस क्रमांक ११६ साठी तिकीट दर २३० रुपये आणि बस क्रमांक ११७ साठी २७० रुपये ठेवले होते. या बस सेवेचे भाडे खासगी बस ऑपरेटर आणि बेस्टच्या चलो बसपेक्षा जवळपास दुप्पट आहे.

logo
marathi.freepressjournal.in