नेरुळमध्ये इमारतीचे स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू, 7 जखमी

सदर स्लॅबच्या वजनामुळे पाचवा, चौथा, तिसरा, दुसरा आणि पहिला या सर्व मजल्यांचे स्लॅब एकावर एक कोसळून तळमजल्यावरील फ्लॅटमध्ये स्लॅबचा ढिगारा पडला
नेरुळमध्ये इमारतीचे स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू, 7 जखमी

नवी मुंबई : नेरुळ सेक्टर -17 मधील जिमी पार्क इमारतीच्या ए विंग मधील सहाव्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत सदर इमारतीतील पाच मजल्याचे स्लॅब एकावर एक कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत स्लॅबच्या ढिगाऱयाखाली दबून पडलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू तर 7 जण जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या घटनेतील जखमींना डी.वाय. पाटील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आहे. दुर्घटनाग्रस्त जीमी पार्क इमारतीत ए आणि बी या दोन विंगमध्ये प्रत्येकी 16 मिळून एकूण 32 फ्लॅट असून सदर इमारतीच्या आवारात अन्य 10 रो हाऊसेस आहेत. मागील आठवडÎाभरापासून या इमारतीतील ए विंग मधील सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये फ्लोरींगचे काम सुरू आहे. शनिवारी सदर फ्लॅटच्या हॉलमध्ये व्हायब्रेटर मशीनच्या सहाय्याने फ्लोरिंगचे काम सुरू असताना सहाव्या मजल्यावरील फ्लोरिंगसह पाचव्या मजल्याचा स्लॅब खाली कोसळला. सदर स्लॅबच्या वजनामुळे पाचवा, चौथा, तिसरा, दुसरा आणि पहिला या सर्व मजल्यांचे स्लॅब एकावर एक कोसळून तळमजल्यावरील फ्लॅटमध्ये स्लॅबचा ढिगारा पडला. या दुर्घटनेत क्षतीग्रस्त झालेल्या पाच मजल्यावरील एकूण 8 रहिवाशी ढिगाऱयाखाली अडकून पडले. या घटनेची माहिती मिळताच महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ढिगाऱयाखाली अडकुन पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू केले. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱयाखाली अडकून पडलेल्या सात जणांची सुटका केली. मात्र पाचव्या मजल्यावर राहणाऱया व्यंकटेश नाडर (31) हा तरुण ढिगाऱयाखाली दबून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याला देखील नंतर ढीगाऱयातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर या घटनेतील सर्व जखमींना नेरूळ मधील डी.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीने जिमी पार्क ही संपूर्ण इमारत रहिवासमुक्त (रिकामी) करण्यात आली असून महापालिकेने या इमारतीत राहणाऱया सर्व कुटुंबांची विविध ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली आहे. या दुर्घटनेत मृत झालेला व्यंकटेश नाडर हा मुळचा बेंगलोर स्थित असून तो मायक्रोसॉफ्ट कंपनीत कामाला होता. तसेच तो मागील काही महिन्यांपासून घरूनच (वर्क फ्रॉम होम ) काम करत होता. सदर दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱयात अडकलेल्या निशा धर्माणी (48) रिया धर्माणी (20), सोनाली गोडबोले (29), आदित्यराज गोडबोले (15), सौमित्र गोडबोले (50), ललिता त्यागराजन (80) आणि सुब्रमण्यम त्यागराजन (84) या सात रहिवाशांना बाहेर काढले. यातील निशा धर्माणी व सुब्रमण्यम त्यागराजन या दोघांना डॉ. डी.वाय.हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. या इमारतीतील कुटुंबांची व्यवस्था नेरूळ सेक्टर 9 मधील नवी मुंबई महापालिकेच्या अहिल्यादेवी होळकर समाजमंदिर तसेच वाशी येथील विविध स्टेट भवनात केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in