नवी मुंबई : दारूची पार्टी करण्यासाठी बसलेल्या पाच मित्रांमध्ये झालेल्या भांडणात चौघा मित्रांनी एका मित्रावर चाकूहल्ला केल्याने सदर मित्राचा मृत्यू झाल्याची घटना पनवेलमध्ये उघडकीस आली आहे. या घटनेनंतर चौघा मित्रांनी आपला मित्र बेशुद्ध पडल्याचे सांगून जखमी विजयला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र विजयचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर चौघा मित्रांनी रुग्णालयातून पलायन केले होते. अखेर पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन त्यातील एका आरोपीला अटक केली आहे.
या घटनेतील मृत तरुणाचे नाव विजय बाळासाहेब कळसे (२७) असे असून तो मानखुर्द येथील जयहिंद नगरमध्ये राहत होता. तर त्याचे मित्र रवी मेवाती, राहुल मेवाती, तरुण वाल्मिकी व त्यांचा चौथा सहकारी हे चौघे वेगवेगळ्या ठिकाणी राहण्यास होते. हे पाचही जण एकमेकांचे मित्र असल्याने रविवारी सायंकाळी ते सर्वजण पनवेलमधील उसर्ली येथील ओमेगा सोसायटीत राहणाऱ्या राहुल मेवाती याच्या घरी पार्टीसाठी एकत्र आले होते. यावेळी सगळ्यांनी दारूची पार्टी केली, दारूच्या नशेमध्ये त्यांच्यात वादावादी होऊन भांडण झाले.
या भांडणामध्ये त्यातील एकाने विजयवर चाकूहल्ला केला. त्यामुळे विजय गंभीर जखमी होऊन पडल्यानंतर चौघांनी रुग्णवाहिका बोलावून त्यातून विजयला उपजिल्हा रुग्णालयात नेले. विजयचा मृत्यू झाल्याचे समजताच विजयच्या चारही मित्रांनी रुग्णालयातून पलायन केले होते. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू केल्यानंतर रवी मेवाती हा आरोपी कामोठे येथील नातेवाईकाकडे लपून बसल्याची माहिती मिळाल्यांनतर पोलिसांनी त्याला सोमवारी ताब्यात घेतले.
विजयने मारहाण केल्याने रवीने रागाच्या भरात विजयवर चाकूहल्ला केल्याची कबुली दिली. या हत्या प्रकरणात इतर तिघांचा समावेश आहे की नाही, याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.